डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत सर्व रस्त्यांवर मोठी गर्दी जमा झाली आहे. नागरिकांनी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरी साहित्य खरेदीवर भर दिला आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येपासून बौद्ध अनुयायी दादरमध्ये दाखल झाले आहेत. लांबुन आलेल्या अनुयायांसाठी राहण्याची व्यवस्था शिवाजी पार्क येथे करण्यात आलीये. तसेच जेवणासह इतर सुविधांची देखील सोय करण्यात आली आहे. यंदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या आहेत.
महामानवाला अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आशिष शेलार, राहुल शेवाळे, दीपक केसरकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले आहे.
आपल्या देशाचा कारभार बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे चालतो. त्यांचे अनुयायी फक्त देशभरात नाही तर जगभरात आहेत. इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.