-राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतःचा गट म्हणजेच राष्ट्रवादी अशी भूमिका घेतलेले अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून आता शरद पवार , जयंत पाटील यांच्यासंदर्भाने अनेक गौप्य्स्फोट केले जात आहेत. जयंत पाटील यांनी दिलेले शब्द पाळले नाहीत असे आता अजित पवार म्हणत आहेत. कदाचित अजित पवार बोलत आहेत ते सत्य असेलही, मात्र सत्य बोलण्यासाठी अजित पवारांना नेमकी हीच वेळ का आठवत आहे ? इतके दिवस या विषयावर अजित पवार मौन का होते ?
---
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतःच्या गटाचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांनी पक्षाचे शिबीर घेतले. या शिबिरानंतर अजित पवारांनी आ. प्रकाश सोळंके यांचा सन्दर्भ देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबतीत धक्कादायक विधाने केली आहेत. जयंत पाटील यांनी आ. प्रकाश सोळंके यांना सुरुवातीला कार्याध्यक्ष आणि नंतर प्रदेशाध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता, मात्र त्यांनी तो पाळला नाही असे आता अजित पवार म्हणत आहेत.
अजित पवार हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचे पक्षातील वजनदार नेते आहेत. शरद पवारांनी जितक्या 'संधी ' अजित पवार यांना दिल्या, तितक्या पक्षातील इतरांना क्वचितच दिल्या असतील. म्हणून अजित पवार जे बोलत आहेत, त्याला अर्थ नाही असे म्हणता येणार नाही. पण अजित पवार जे काही सांगत आहेत, ते २०१९ मधले आहे. त्यावेळी आ. प्रकाश सोळंके यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. आणि नंतर त्यांची 'समजूत ' काढण्यात आली होती. विशेष म्हणजे अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे त्यावेळी आ. प्रकाश सोळंके यांनी जाहीर समर्थन केले होते. याचा अर्थ आ. प्रकाश सोळंके हे पक्षात सुरुवातीपासून अजित पवार यांचेच समर्थक आहेत. मग आपल्या समर्थक आमदाराला पक्षाने दिलेला शब्द पाळला जात नसताना अजित पवारांसारख्या नेत्याबद्दल आतापर्यंत मौन का बाळगून होता हा प्रश्न आहेच. पक्षातील अजित पवारांची त्यावेळची 'दादागिरी ' पाहता त्यावेळी जर अजित पवार काही जाहीरपणे बोलले असते किंवा त्यांनी काही भूमिका घेतली असती , तर त्यांना विरोध करण्याची किंवा त्यांचा प्रतिवाद करण्याची पक्षात कोणाची हिम्मत नव्हती. पहाटेच्या शपथविधीच्या जिथे राष्ट्रवादीच्या, शरद पवारांच्या राजकीय विश्वासहर्तेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले होते , खरेतर हा फार मोठा प्रमाद होता, तरीही अजित पवार सोबत आल्याशिवाय म्हणा किंवा परत आल्याशिवाय म्हणा , महाविकास आघाडीचे सरकार स्थिर होणार नाही असाच सूर पक्षातील त्यावेळच्या अजित पवार विरोधक मानल्या जाणाऱ्या छगन भुजबळ आणि इतर नेत्यांनीही लावला होता. म्हणजे त्यावेळच्या एकत्रित राष्ट्रवादीत अजित पवार स्वतःच्या मनाप्रमाणे काही करू शकत होते. मात्र त्यांनी यासंदर्भाने काय केले हा प्रश्नच आहे. जसे आ. प्रकाश सोळंके यांचे तसेच अनिल देशमुखांचे. अनिल देशमुख मंत्रिपद मिळत नसल्याने आमच्यासोबत आले नाहीत आणि भाजपने त्यांच्या मंत्रिपदाचा विरोध केला , कारण भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते असे आता अजित पवार म्हणत आहेत. आरोपांचाच विषय असेल तर भाजपने आरोप केलेले काही अनिल देशमुख एकमेव नाहीत. इतरांचे सोडा , अगदी अजित पवारांच्या संदर्भाने देखील देवेंद्र फडणवीस कितीतरीवेळा जाहीर सभा मधून 'चक्की पिसींग , पिसींग अँड पिसींग ' म्हटले होतेच. मग अजित पवारांनी याची जाणीव भाजपला करून दिली नसेल का ?
मुळात अनिल देशमुखांनी कोणत्या गटात राहावे किंवा आ. प्रकाश सोळंके यांना पक्षाने काय शब्द दिला होता, याच्याशी राज्यातील जनतेला काहीही देणेघेणे असण्याचे देखील कारण नाही. तो खरेतर सर्वांचाच पक्षांतर्गत मामला आहे. पण आता वेगळा गट पडल्याने जर अजित पवार मागच्या गोष्टींचे खापर फोडण्यासाठी कोणते तरी डोके शोधणार असतील, तर त्याला पश्चातबुद्धीच म्हणावे लागेल. महाभारताच्या युद्धात ज्यावेळी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत खचते आणि कर्ण अर्जुनाला धर्माची आठवण करून देतो, त्यावेळी कृष्णाने कर्णाला 'राधासुता , तेव्हा कोठे गेला होता तुझा धर्म 'म्हणत इतिहासाची आठवण करून दिली होती. आताही त्यावेळी अजित पवारांचे मौन का होते आणि अजित पवारांनी तरी तेव्हा आणि आताही अनेकांना दिलेल्या शब्दांचे काय झाले ? हा प्रश्न आहेच.
बातमी शेअर करा