Advertisement

संपादकीय अग्रलेख- ही काँग्रेस संस्कृती नव्हे?

प्रजापत्र | Saturday, 25/11/2023
बातमी शेअर करा

 राहुल गांधी हे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष नसतील पण काँग्रेसचा चेहरा म्हणूनच राहुल गांधीकडे पाहिले जाते. ज्यावेळी देशात इतर अनेक राजकीय पक्ष आक्रस्ताळी भूमिका घेत होते. त्याही काळात काँगे्रेसने संयत भूमिका घेतलेली आहे. कोणत्याही विषयावर विधान करताना संतुलित आणि संयमीत बोलणे ही काँग्रेसची परंपरा आहे. या परंपरेला राहुल गांधी मात्र सातत्याने धक्के देताना दिसत आहेत.

 

 राहुल गांधी हा काँग्रेसचा भविष्यातला चेहरा आहे. राहुल गांधी ज्यावेळी राजकारणात आले तेंव्हापासून विरोधी पक्षाने त्यांची प्रतिमा ‘पप्पू’ बनविण्याचा भरपूर प्रयत्न केला. असे असतानाही राहुल गांधींची देशातील प्रतिमा सातत्याने सुधारत गेली. मात्र जरा कुठे प्रतिमा सुधारली की राहुल गांधी स्वत:हून कुठल्यातरी वादात अडकतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. 
भारतीय राजकारणात संंसदीय बोलण्याला मोठा अर्थ असतो तशी मोठी परंपरा आपल्या संसदीय राजकारणाला आहे. कुठल्यातरी पक्षाची विधवा किंवा असलेच काही आघळपघळ आरोप करण्याचा मक्ता आतापर्यंत भाजपाकडे होता. भाजपाच्या नेत्यांनी आता काहीही विधाने केली तरी ती त्यांच्या पक्षाची संस्कृती म्हणून त्याकडे पाहिले जाते आणि लोकांनाही त्यात आता फारसे काही आक्षेपार्ह वाटत नाही. मात्र भाजपाच्या नेत्यांना काहीही विधाने करता येतात याचा अर्थ इतरांनी तसे वागावे असे नाही

 

म्हणूनच राहुल गांधींसारखा नेता ज्यावेळी पंतप्रधान पदावरील व्यक्तीच्या संदर्भाने एखादे विधान करतो आणि त्यात ‘पनवती’सारखा शब्द असतो.त्यावेळी देशातील कोणत्याही सजग आणि संवेदनशील व्यक्तीला ते विधान राहुल गांधींच्या तोंडातून रूचत नसते. यापूर्वी देखील राहुल गांधी यांनी अशा अनेक प्रकरणात स्वत:हून वाद ओढावून घेतले आहेत. देशात संयुक्त पुरोगामी आघाडीची सत्ता असताना मनमोहन सिंग सरकारने काढलेला अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडण्याचा पोरकटपणा राहुल गांधी यांनी केला होता. नंतरच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.राहुल गांधींनी देशव्यापी भारत जोडो यात्रा काढली. त्यातून त्यांची प्रतिमा अधिकच प्रगल्भ होतेय असे वाटत होते. मधल्या काळात म्हणजे यात्रेच्या पूर्वी कधी सावरकरांच्या विषयावरून तर कधी चौकीदार चोर है यावरून राहुल गांधी यांनी वाद ओढावून घेतले होते. त्या वादाचा मोठा फटका त्यांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या प्रतिमेला बसला.त्यामुळे आतातरी राहुल गांधी सुधारले असतील असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपाच्या पाऊलावर पाऊल टाकत वायफळ विधाने सुरू केली आहेत.भाजपाला तर हेच हवे आहे. मुख्य मुद्यापेक्षा इतरच वायफळ प्रश्‍नांवर चर्चा होणार असेल आणि त्यामुळे बेरोजगारी, धार्मिक धु्रर्वीकरण, संकटातील अर्थव्यवस्था असे लोकांच्या जगण्या मरण्याचे विषय दुर्लक्षित होणार असतील तर भाजपालाच काय कोणत्याही सत्तेला ते हवेच असते आणि त्या सापळ्यात राहुल गांधी नेमके अडकत आहेत. राहुल गांधी यांचे काँग्रेसमधले स्थान फार मोठे आहे पण असंतुलीत किंवा तात्पुरती टाळ्या मिळवणारी वायफळ वक्तव्य ही काँग्रेसची संस्कृती नाही हे कोणीतरी राहुल गांधींना सांगण्याची वेळ आली आहे.

Advertisement

Advertisement