Advertisement

संपादकीय अग्रलेख - आरक्षणाची मागणी आणि लायकीची भाषा

प्रजापत्र | Wednesday, 22/11/2023
बातमी शेअर करा

    एकीकडे आरक्षणाची मागणी करायची, आरक्षण मिळाल्याशिवाय विकासाच्या संधी मिळणार नाहीत असेही म्हणायचे आणि त्याचवेळी आरक्षणातून जे लोक आले आहेत, त्यांची लायकी देखील काढायची, हा सारा प्रकार म्हणजे दुटप्पीपणाचा कळस आहे. मुळात आरक्षण ही संकल्पनाच मागणी करणाऱ्या नेत्यांना समजली आहे का असा प्रश्न पडावा असे हे वागणे आहे. म्हणूनच आरक्षणाची मागणी करणारांनी विधाने करताना अधिकची काळजी घेतली पाहिजे.
 

 

     मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मागच्या अनेक वर्षांपासूनची आहे. त्यातही मागच्या दोन दशकात आरक्षणाची आवश्यकता आणि त्याची तीव्रता मराठा समाजाला अधिक जाणवू लागली आहे. मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून आणि प्रयत्नांमधून मराठा समाजात शिक्षणाचे आणि स्पर्धा परिक्षांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले. 'स्पर्धा परीक्षांमधून मिळणाऱ्या नोकऱ्या म्हणजेच आजचे गड किल्ले आहेत, आणि ते आपण सर केले पाहिजेत' अशी भावना मराठा सेवा संघाच्या विचारधारेतून या समाजात रुजली आणि मग त्यातूनच शिक्षण आणि नोकरीमध्ये संधी मिळवायची असेल तर आरक्षण हवे या मागणीला देखील अधिकचे बळ मिळाले. या आरक्षणाच्या विषयात अनेकांनी आपले योगदान दिले आहे, त्या कोणाच्या योगदानाची कोणाशी तुलना करण्याचे देखील काही कारण नाही. आता मनोज जरांगे यासारख्या माध्यमातून मराठा समाजाला एक नवा चेहरा मिळाला आहे. आज राज्यभरातील मराठा समाज, विशेषतः तरुणाई आणि ग्रामीण भागातील गरीब मराठा मनोज जरांगे यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे, आणि त्यामुळेच अशावेळी मनोज जरांगे यांची जबाबदारी अधिक वाढलेली असते. ज्यावेळी कोणीही एका मोठ्या समूहाचे नेतृत्व करीत असतो, त्यावेळी आपण काय बोलत आहोत आणि त्याचा काय अर्थ निघतो याचा विचार केला जाणे आवश्यक असते.

 

      मनोज जरांगे यांनी आपल्या भाषणात 'मराठा समाजातील तरुणांना आरक्षण नसल्यामुळे लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे' असे विधान केले. मुळात ज्यांना आरक्षण भूमिका म्हणून समजले आहे, ते लोक इतरांची लायकी काढूच शकत नाहीत. इतरांची लायकी काढणे म्हणजे ज्यांना आरक्षणामधून संधी मिळाली आहे, त्यांच्यामध्ये गुणवत्ता कमी आहे असे सांगणेच आहे. मधल्या काळात 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन ' म्हणून जे काही उपदव्याप एका संघटनेच्या बौद्धिकातून सुरु झाले होते, त्याच मानसिकतेचे हे विधान आहे, असेही आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांना संधी मिळाली, त्यांची खाजगी चर्चेत अनारक्षित वर्गातील अनेकजण हेटाळणी करीत असतात. आरक्षित जगावे संधी मिळवायला जणूकाही कांहीच गुणवत्ता लागत नाहीं, आणि सारी गुणवत्ता अनारक्षित प्रवर्गातच ठासून भरलेली आहे असा एक दंभ अनारक्षित वर्गातील काहींच्या मनात भरलेला आहेच. त्यातूनच स्वतःला कथित सवर्ण म्हणवणारा वर्ग, असली विखारी मानसिकता समाजात पसरवित असतो.

 

     आता प्रश्न हा आहे की ज्यांना आरक्षण हे तत्व म्हणून मान्य आहे, त्यांनी असल्याचं दंभाच्या पालख्या वाहाव्यात का? आपण जर आरक्षणाच्या माध्यमातून संधी मागत आहोत, तर जे आरक्षणाच्या माध्यमातून आज वेगवगेळ्या पदांवर आहेत, त्यांच्यामध्ये गुणवत्ता नाही असा बुरसटलेले विचार आपण कसा मांडू शकतो? आरक्षित जागेवर संधी मिळविण्यासाठी देखील गुणवत्ता लागतेच, किंबहुना अनेक ठिकाणी त्यातील स्पर्धा फार मोठी आहे, मात्र हे न समजून घेता एकीकडे आरक्षणातून संधी देखील पाहिजे आणि दुसरीकडे ज्यांनी आरक्षित जागांवर नोकऱ्या मिळविल्या आहेत, त्यांच्याप्रती तिरस्काराची भूमिका देखील ठेवायची हा प्रकार असेल तर यातून आरक्षित वर्गाची सहानुभूती मिळणार कशी? आमच्याकडे गुणवत्ता आहे हे सांगणे वेगळे, मात्र त्याचवेळी इतरांची लायकी नाही असे जर सांगितले जात असेल तर याला काय म्हणायचे. ही मानसिकता काय दर्शविते?
 

Advertisement

Advertisement