Advertisement

गेवराईच्या पतसंस्था, मल्टिस्टेट संघटनेने काय घेतला निर्णय? केले कोणते आवाहन?

प्रजापत्र | Wednesday, 22/11/2023
बातमी शेअर करा

गेवराई - ज्ञानराधा पाठोपाठ साईराम मल्टीस्टेटमध्ये अफवांमुळे ग्राहकांनी रक्कम काढण्यासाठी गर्दी केली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यातील मल्टीस्टेट व पतसंस्थेच्या ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून अफवांमुळे सहकारी संस्था चालक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान इतर संस्थेत देखील ग्राहक रक्कम काढण्यासाठी गर्दी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. एकाच वेळी ग्राहकांनी गर्दी केल्यास संस्थाचालकांना त्यांची रक्कम देणे शक्य होत नाही, त्यामुळे खबरदारी म्हणून यापुढे संस्थेतून दिवसाला १० हजाराची विड्राल देण्याचा निर्णय गेवराई तालुक्यातील मल्टीस्टेट तसेच पतसंस्था संघटनेने घेतला आहे. तरी या संस्थेच्या ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. 

     बीड जिल्ह्यात अफवांमुळे मल्टीस्टेट, पतसंस्थेविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशातच एकाचवेळी ग्राहक ठेवीच्या रक्कम काढण्यासाठी गर्दी करत असल्याने संस्थाचालकांपुढे अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे गेवराई तालुक्यातील मल्टीस्टेट व पतसंस्था चालकांनी मंगळवारी बैठक आयोजित करुन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एका ग्राहकाला दिवसाला १० हजाराची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाचवेळी ग्राहकांनी गर्दी केल्यास कोणत्याही संस्थाचालकांना ठेवी परत करणे शक्य होणार नाही, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ठेवी ग्राहकांना मुदतपूर्व न देण्याचा देखील निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून ठेवीदारांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता आजपर्यंत केलेल्या सहकार्य यापुढे देखील कायम ठेवण्याचे आवाहन संस्थाचालकांनी केले आहे. या बैठकीला गेवराई तालुक्यातील सर्व मल्टीस्टेट व पतसंस्था संघटनेचे पदाधिकारी, सदस्य यांची उपस्थिती होती. 

 

ठेवी सुरक्षित, मात्र अफवांमुळे होतेय गर्दीम

मल्टीस्टेटसह पतसंस्थेत गुंतवणूक आल्यानंतर संस्थाचालक त्यांच्याकडील ठेवीच्या तुलनेत ३० टक्के रक्कम शेष ठेवून इतर ठेवीच्या रक्कम कर्ज स्वरुपात व्यवसायिक, शेतकरी आदींना वाटप करतात. यामधून संस्थेचे आर्थिक चक्र चालले जाते. मात्र सध्या काही अफवांमुळे मल्टीस्टेट व पतसंस्थेत ठेवी काढून घेण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. अशावेळी संस्थेकडे असलेली शेष रक्कमच संस्थाचालक ग्राहकांना वितरीत करु शकतात. तर कर्ज वाटप हे काही मुदतपूर्व वसुली होत नाही, त्यामुळे ग्राहकांनी आपल्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्या विश्वासानी ग्राहकांनी संस्थेत गुंतवणूक केली त्या विश्वासाला तडा जाणार नाही, हा विश्वास ठेवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी संस्थाचालकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement