Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - वाचाळपणा थांबवाचं

प्रजापत्र | Tuesday, 21/11/2023
बातमी शेअर करा

      मागच्या काही काळात राज्यात अनेक नेत्यांकडून सातत्याने वाचाळपणा सुरु आहे. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे असे जे काही सुरु आहे, त्यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा तर बिघडत आहेच, त्यासोबतच अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होत आहे. भुजबळ, वडेट्टीवार असोत किंवा अगदी मनोज जरांगे , किंवा राऊत राणेंसारखे नेहमीचे कलाकार, कोणाचाही वाचाळपणा जर सामान्यांच्या जीवांवर बेतणारा ठरणार असेल आणि दुही वाढविणारा असेल तर तो हरप्रयत्नाने थांबवलाच पाहिजे .

       राज्यातील विरोधी पक्ष नेते असलेल्या विजय वडेट्टीवारांनी एकीकडे भुजबळ यांच्या 'टोकाच्या' भूमिकेशी आपण सहमत नाही आणि यापुढे आपण भुजबळ यांच्यासोबत दिसणार नाही असे सांगितले, त्याचे साहजिकच मराठा समाजाकडून स्वागत झाले, मात्र त्याचवेळी याच वडेट्टीवारांनी मुस्लिम समाजाच्या संदर्भाने जे वक्तव्य केले, ते मात्र विखारी म्हणावे असेच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ घेऊन, 'तर देशाचे तुकडे झाले असते' असे जेव्हा काँग्रेसच्या पठडीतला नेता बोलतो, त्यावेळी राजकारण बाजूला सोडले, तरी एका समाजाच्या संदर्भाने आपण कोणते चित्र रंगवत आहोत, याचे भान असायला हवे. त्यातही संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने ते अधिक ठेवायला हवे. वडेट्टीवार काय, भुजबळ काय किंवा आणखी कोणीही, त्यात मग संजय राऊत , राणे कुटुंबीय आणि सगळेच आले. आपण काय बोलत आहोत, याचे भान ठेवायला कोणीच तयार नसल्याचे चित्र आहे.
      मुळात मागच्या काही वर्षात राज्यातले राजकारण आणि समाजकारण मोठ्याप्रमाणावर बदलले आहे, हा बदल आहे तो राजकारण, समाजकारणाच्या स्तराच्या संदर्भाने. वाचाळपणा म्हणजेच खूप काही असे समजण्याची एक नवी धारणा सध्या राजकारण, समाजकारणात रूढ झाली आहे. अन् मग राजकारणातील संवैधानिक पदे भूषविणारे असोत व समाजकारणात समाजाचे नेते म्हणून पुढे येणारे मनोज जरांगे यांच्यासारखे नेते असोत, यांनी आपले प्रश्न, आपले विषय, आपली भूमिका मांडताना तळमळीसोबतच एक प्रकारची संसदीय मर्यादा देखील पाळायला पाहिजे, आपल्या विधानाने कोणालाच चिथावणी मिळू नये इतकी काळजी तरी घेतली जावी. पूर्वी राजकारण, समाजकारण करणारे लोक ती काळजी घ्यायचे, मात्र मागच्या काही काळात ते सारे इतिहासजमा झाले आहे. आणि कोणत्याही आंदोलनाच्या दृष्टीने ते घातक आहे.

 

      यापूर्वी देखील 'प्रजापत्र 'ने अनेकदा जी बाब मंडळी आहे, ती म्हणजे आंदोलन, अभियान जो पर्यंत सनदशीर असते, शांततापूर्ण असते, तो पर्यंत त्याला चिरडणे सोपे नसते, मात्र यात एकदा का विखार, विद्वेष घुसला आणि ते हिंसक होऊ लागले की मग मात्र सरकारला ते दडपण्याचा संधी मिळत असते. इतिहासात फार लांब जाण्याची आवश्यकता नाही. अगदी काही वर्षांपूर्वी शेजारच्या गुजरातेत जे घडले त्याचा जरी अभ्यास केला तरी पुरेसे आहे. तेथील पाटीदार समाजाचे जे आंदोलन सुरु होते, त्यात मोठ्याप्रमाणावर पाटीदार समाज सहभागी होता. हार्दिक पटेल, या त्यावेळच्या कालच्या पोराने त्यावेळी १२ लाखाहून अधिकच मोर्चा काढला होता आणि सरकारला विचार करायला भाग पाडले होते, मात्र नंतरच्या काळात आंदोलन हिंसक झाले आणि आंदोलनाच्या नेत्यांचा देखील बोलण्यातला तोल ढळला, त्यावेळी त्याच हार्दिक पटेल विरोधात थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. नंतरच्या काळात पाटीदार आंदोलनाचे काय झाले हे सर्वांनीं पहिले आहे. म्हणूनच वाचाळपणा कधीतरी आंदोलकांमध्ये उत्साह भरायला एखादेवेळी उपयोगी ठरत असेलही, मात्र वाचाळपणाच्या नादात दोन समूहांमध्ये, दोन धर्मांमध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण होणार असेल आणि एखाद्या समाजाची विकृत प्रतिमा निर्माण होणार होणार असेल तर पुढाऱ्यांनी मग ते कोणतेही असोत, जिभेला आवरायलाच हवे.
 

 

Advertisement

Advertisement