Advertisement

महिनाभरानंतरही सापडत नाही हिंसाचाराचा मास्टरमाईंड-शेंडगे

प्रजापत्र | Saturday, 18/11/2023
बातमी शेअर करा

बीड दि.18 (प्रतिनिधी): मराठा आरक्षण आंदोलनाची धग बीडला बसली. जे मणिपूरमध्ये घडले तेच बीडला घडले. बीडमधील हिंसाचाराला इतके दिवस होवूनही याचा मास्टरमाईंड सापडत नाही, यामुळे ओबीसी समाज दहशतीखाली असल्याचे प्रतिपादन प्रकाश शेंडगे यांनी केले. तसेच हिंगोली येथे ओबीसी मेळावा होणार असल्यचे ते म्हणाले.

 

ओबीसी समाजाने राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली येथील मेळाव्याच्या तयारीसाठी ओबीसी नेते बीडमध्ये आले होते. यावेळी ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. जालना जिल्ह्यात ओबीसींचा झालेला मेळावा हा कोणाला दुखावण्यासाठी नाही तर ओबीसींना भितीतून बाहेर काढण्यासाठीचा होता असे शेंडगे म्हणाले. बीडमध्ये जे घडले ते मणिपूरसारखेच होते. हिंसाचाराला महिनाभर उलटूनही मास्टरमाईंड सापडत नाही, यामुळे ओबीसी समाज दहशतीखाली आहे, या हिंसाचारामागे कोणी राजकीय व्यक्ती आहे का? याचा शोध घ्यावा असे शेंडगे म्हणाले. अंतरवलीत सभेला जागा देणार्‍या शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली मग बीडमधील हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई का दिली नाही असा सवालही शेंडगे यांनी केला. आमच्या लेकराबाळाच्या हक्काचे आरक्षण आम्ही काढू देणार नाही असे सांगतानाच छगन भुजबळ यांनी कोणतेही भडकावू भाषण केले नाही, केवळ गावबंदीचे बॅनर काढा असे ते पोलीसांना म्हणाले, असेही शेंडगे म्हणाले. यावेळी अ‍ॅड.सुभाष राऊत यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.
 

Advertisement

Advertisement