बिदरच्या कंपनीला 'स्थानिक 'च्या कोणी पुरविले नेटवर्क ?
बीड दि.१६-दिवाळीच्या काही दिवस अगोदर सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याचे कंटेनर पकडले होते.यातील गुटख्याचे कनेक्शन थेट बिदरपर्यंत असल्याची माहिती असून या व्यवसायातून अनेकांना 'संतोष' मिळावा यासाठी 'स्थानिक'च्याच काहींनी वाटा उचलला आणि त्यातूनच गुटख्याचा 'सागर' बीडपर्यंत पोहचला असल्याची चर्चा आहे.त्यामुळे आता याची पाळेमुळे पोलीस खरोखर शोधणार का हा प्रश्न कायम आहे.
बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी करणाऱ्या काही टोळ्याच कार्यरत आहेत आहेत आणि यातील अनेकांना साहजिकच यंत्रणेचेच आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. तरीही काही कर्तव्यदक्ष अधिकारी गुटख्याच्या कारवाया करीत असतात. अशीच एक कारवाई काही दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केली आहे.त्यांनी महामार्गावरून गुटख्याचा एक कंटेनर पकडून तो बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात लावला असून या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार गुटख्याचा 'सागर ' शोधण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी अगदी बिदरपर्यंत धडक मारल्याची देखील चर्चा आहे. मात्र यात पुढे नेमकी काय कारवाई झाली हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
दरम्यान परराज्यात कनेक्शन असलेल्या या गुटख्याच्या सागराला बीड जिल्ह्यात वाट मोकळी व्हावी यासाठी 'स्थानिक'च्या काहींनी मेहनत घेतल्याची चर्चा आहे. 'सागराचा' लाभ सर्वांना व्हावा यासाठी यंत्रणेतीलच काहींनी जोर लावला आणि त्यातून अनेकांना 'संतोष' झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.त्यामुळे आता ते 'स्थानिक' वाले कोण याचा शोध घेण्याचे आव्हान पंकज कुमावत यांच्यासारख्या अधिकाऱ्यांसमोर देखील असणार आहे.
कुमावत हीच आशा
बीड जिल्ह्यात सध्या सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या धडाकेबाज कारवाया सुरु आहेत. अगदी बीडमध्ये काम करून सध्या बाहेर जिल्ह्यात असलेले अधिकारी देखील 'तुमच्या जिल्ह्यात आता पंकज कुमावत यांच्याकडूनच काय त्या अपेक्षा आहेत' असे खाजगीत बोलतात.पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांचे कंबरडे देखील बऱ्यापैकी मोडले आहे.मात्र कुमावतांनी कारवाई केल्यानंतर त्याचा पुढचा तपास मात्र स्थानिक पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर कुमावतांसारख्या अधिकाऱ्यांची मेहनत देखील वाया जाते.हे होऊ नये यासाठी पोलिस दलातील पोलीस अधीक्षकांपासून सर्वच अधिकाऱ्यांनी ठाणेदारांना सूचना देणे आवश्यक आहे.