बीड : दिवाळी सुरु झालेली असतानाच येत्या काही दिवसात बीड जिल्हा पोलीस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे फटाके फुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून आता बदल्यांची वात कधी पेटवली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. बीड जिल्ह्यातील हिंसाचाराच्या प्रकरणात कठोर भूमिका घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आलेले अपयश आणि आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे असलेले निर्देश याची गोळाबेरीज करून बदल्या केल्या जाणार आहेत.
बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात बहुतेकांनी पोलिसांवर खापर फोडले आहे.त्यातही हिंसाचारानंतर देखील अजूनही ठोस कारवाईत पोलीस कमी पडत असलत्याचे बहुतेक नेत्यांनी वारंवार सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्हा पोलीस दलात बदल्यांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. सारे काही नियोजन वेळेत ठरले तर कदाचित दिवाळीचा उत्सव संपायच्या अगोदर देखील बदल्यांचे फटाके फुटलेले असतील.
एकीकडे असे असतानाच बदल्या करतांना आता लोकसभा निवडणुकांचा विचार देखील करावा लागणार आहे.निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात दिलेल्या सूचना स्पष्ट असून निवडणुकीशी थेट संबंध येणाऱ्या पदावर जिल्ह्यात तीन वर्ष पूर्ण केलेले अधिकारी किंवा स्व-जिल्ह्यातील अधिकारी द्यायचे नाहीत. यामुळे आता सर्व ठाणेदार आणि स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे 'नियोजन' या सूचना विचारात घेऊनच करावे लागणार आहे.
बीड शहरात जो हिंसाचार झाला, तो रोखण्यात आणि त्यानंतरच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि काही ठाणे प्रभारी कमी पडल्याचा आक्षेप अनेक नेत्यांचा आहे.त्यामुळे या बदली प्रक्रियेत या आक्षेपाचाही विचार 'नियोजनकर्त्यांना' करावा लागणार आहे. आता बदल्यांचे नियोजन नेमके काय होते याचीच प्रतीक्षा सर्वांना आहे.