Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - सामाजिक आरोग्य लाभू दे

प्रजापत्र | Friday, 10/11/2023
बातमी शेअर करा

 भारतीय संस्कृतीमधील आनंदाचा आणि उत्साहाचा सण असलेल्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. कृषी संस्कृतीशी नाते जोडणारी वसुबारस काल झाली आणि आज धनत्रयोदशी. याचा संबंध जितका धनाशी, तितकाच आजचा दिवस आरोग्याची काळजी घेणाऱ्या धन्वंतरी पूजनाचा. या निमित्ताने आज धोक्यात आलेल्या सामाजिक आरोग्यासाठी आपण प्रार्थना करूयात आणि येणार काळ सामाजिक आरोग्य सदृढ करणारा ठरो अशी अपेक्षा ठेवूयात. कारण अंधार कितीही झाला तरी एक छोटी पणती सुद्धा तो दूर करते हे शिकवणारा उत्सव म्हणून तर आपण दिवाळीकडे पाहतो .
 

     दिवाळीच्या उत्सवाला, उत्साहाला सुरुवात झाली आहे. मानवी जीवनात उत्सवाचे महत्व आहेच आहे, आणि भारतीय संस्कृतीने तर प्रत्येक उत्सव सामाजिकतेशी जोडला आहे. दिवाळी हा त्याचाच एक भाग. दिवाळी आजच्या व्यावसायिक धबडग्याच्या काळात भलेही एक दिवसाची झाल्यासारखी वाटत असेल, पण हा उत्सव म्हणजे अनेक नाती जपणारा. कृषी संस्कृतीशी नाते सांगणाऱ्या वसुबारसेपासून ते भाऊबीजेच्या माध्यमातून बहीण भावाच्या भावनिक नात्यांपर्यंत नेणारा हा उत्सव. या उत्सवातला आजचा दिवस धनत्रयोदशीचा. 

 

पुरातन मान्यतेप्रमाणे, देवांचे वैद्य म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे म्हणून धन्वंतरीकडे पाहिले जाते. आजच्या दिवशी त्यांची आठवण काढायची, स्मरण करायचे तर आरोग्याच्या बाबतीत जागृती व्हावी म्हणून. खरेतर ही संकल्पना त्या त्या काळातली. पण काही सण, उत्सव असे असतात, ज्यांच्या संकल्पना काळाप्रमाणे बदलतात, बदलत्या काळाप्रमाणे त्याचे वेगळे अर्थ निघतात आणि त्या संकल्पना जगणे समाजाला समृद्ध अथवा सुकर करायला उपयोगी पडत असतात. म्हणूनच आज धन्वंतरी पूजनाच्या निमित्ताने आरोग्याची संकल्पना व्यापक करण्याची आवश्यता आहे. केवळ शारीरिक आरोग्याच्या पलिकडे जाऊन आज सामाजिक आरोग्यासाठी आपण काय करू शकतो याचे चिंतन आजच्या निमित्ताने होणे आवश्यक आहे.

 

     आजच्या घडीला, सामाजिक स्वास्थ्याच्या, आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्रात कधी नव्हे इतकी अंधकारमय परिस्थिती आहे. या राज्यातील समाजघटक एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकताना दिसत आहेत. कांहीं राजकीय मंडळी समाजात ध्रुवीकरण आणून आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसते. समाजात जिथे परस्पर स्नेहाचे धागे गुंफलेले होते, गावगाड्यामध्ये जिथे एकमेकांशी मने जुळलेली होती, तिथे आज अविश्वासाचे वातावरण निर्माण होताना दिसत आहे. कांहीं समाजकंटकांनी केलेल्या घातकी कृत्यांमुळे आता एक समाज दुसऱ्या समाजासमोर उभा राहणार का असे वातावरण आहे, आणि हेच सामाजिक स्वास्थ्याला घातक आहे. आम्ही पुढच्या पिढीला नेमके काय देणार आहोत हा प्रश्न आहे. ज्या मुद्द्यांवरून किंवा प्रश्नांवरून हे सारे वातावरण निर्माण झाले किंवा केलं आहे त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे, भले त्या मुद्द्यांचा निकाल काही काळात लागेलही, मात्र तोपर्यंत अविश्वासाची, द्वेषाची जी लागण सामाजिक स्वास्थ्याला होणार आहे, त्याचे काय ? त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान भरून निघायला पुन्हा पुढच्या किती पिढ्या खर्ची पडाव्या लागतील याचा विचार आपण करणार आहोत का नाही? हा विचार करण्याची प्रेरणा, या दिवाळीच्या उत्सवाच्या माध्यमातून सर्वांना मिळो व सामाजिक अंधकारमय परिस्थितीत प्रकाश येवून परिस्थितीत बदल घडतो याच प्रार्थनेसह सुरु झालेल्या दीपोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा .

Advertisement

Advertisement