मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी भुजबळ यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी छगन भुजबळ यांच्या शासकीय निवास्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढवली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करत उपोषण सुरू केलं होतं. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातील मराठा बांधवांनी जोरदार प्रतिसाद दिला. जरांगे यांच्या आवाहानानंतर राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणं झाली.काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट देखील लागलं. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन लवकरात लवकर आरक्षण देण्यात येईल, असं आश्वासन दिलं. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र, सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला.
मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ही आमची गेल्या अनेक वर्षांपासूनची भूमिका आहे. पण त्यासाठी आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, असं म्हणत भुजबळ यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला विरोध केला. ओबीसी समाजाने त्याला पूर्ण ताकदीने या निर्णयाचा विरोध करावा. अन्यथा एकदा ओबीसी समाजाने आरक्षण गमावले तर ते पुन्हा मिळवता येणार नाही, असे वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले.दरम्यान, छगन भुजबळ यांना वेळीच आवरा, अशी मागणी मराठा समाजाकडून शिंदे-फडणवीस यांच्याकडे केली जात आहे. अशातच मराठा समाजातील काही लोक छगन भुजबळ यांनी आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, असा आरोप छगन भुजबल यांनी केला आहे. याच कारणास्तव भुजबळ यांच्या शासकीय निवास्थानाबाहेरील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे.