पाटोदा दि.२३(प्रतिनिधी): लग्नाचे आमिष (Crime)दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील गंडाळवाडी येथे उघडकीस आली आहे. लग्नानंतर अवघ्या पाचव्या दिवशी नवरी घरातून पळून गेली असून, या प्रकरणी नवरदेवाची तब्बल ६ लाख रुपयांची फसवणूक झाली असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून बनावट लग्नाचे प्रकार सातत्याने घडत असून संजय पि. शामराव पवार (वय ३४) व्यवसाय शेती, रा. गंडाळवाडी, ता. पाटोदा हे विवाहासाठी मुलीचा शोध घेत होते. आरोपी दत्ता पंढरीनाथ पवार रा. सुपा आणि पठाण रा. चोभा निमगाव यांनी संगनमत करून एका मुलीचे स्थळ सुचवले. त्यानंतर पंढरपूर येथे मुलीची पाहणी करण्यात आली. यावेळी मुलीची मावशी असल्याचे सांगणाऱ्या जयश्री रवी शिंदे आणि एका एजंट महिलेने लग्नासाठी ४ लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने अशी मागणी केली. फिर्यादी संजय यांनी मित्रांकडून पैसे उसने घेऊन ४ लाख रुपये रोख दिले आणि संतोष भालेराव यांच्या म्हणण्यानुसार २ लाख रुपयांचे दागिने खरेदी केले. त्यानंतर १० डिसेंबर रोजी रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव, वैजापूर) हिच्याशी पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने आणि नंतर गावी धार्मिक विधीने लग्न लावून देण्यात आले.लग्नानंतर पाच दिवस रुपाली सासरी चांगली वागली, मात्र १५ डिसेंबर रोजी रात्री ती घरातून कोणालाही काही न सांगता पळून गेली. संजय यांनी मध्यस्थांकडे विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी मुलीच्या मावशीने आणि एजंट महिलेने संजय यांना धमकावत ‘मुलगी येणार नाही, तू परत फोन केला तर तुझ्यावर व तुझ्या मित्रांवर बलात्काराची केस करू’ अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी नवरी रुपाली दिशागंज, मावशी जयश्री शिंदे, एजंट दत्ता पवार, पठाण आणि अन्य एका अज्ञात महिलेवर अमळनेर पोलीस ठाण्यात सोमवार (दि.२२)रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ हे करत आहेत.

