Advertisement

राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या नव्या पुलाला भगदाड

प्रजापत्र | Monday, 06/11/2023
बातमी शेअर करा

विश्वास सोनकांबळे

 

 उमरगा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर चौपदरीकरणात बांधण्यात आलेल्या बलसुर फाट्या जवळील नव्या पुलाला भगदाड पडल्याने सिमेंट लावून बुजविण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या खालच्या बाजूस प्लायऊड मारून जुजबी मलमपट्टी केली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहतुक करणाऱ्या वाहन चालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

         उमरगा तालुक्यातील बलसुर फाट्या जवळील सोलापूर कडे जाणाऱ्या नव्या पुलावर   ५ बाय २  मीटरचे भगदाड पडल्यानंतर रात्रीतून तातडीने सिमेंट काँक्रीटने मलमपट्टी करूण त्यावर संबंधित यंत्रणेचे वाहन दोन दिवस उभे केले होते. जेणेकरून हे भगदाड इतरांना दिसू नये .विशेष म्हणजे फुलाच्या खालून  पुलाला रस्त्यावर प्लाऊड मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकात भीतीचे वातावरण असुन .दोन दिवसानंतर आज सकाळी या भगदाडच्या ठिकाणी उभे असलेले वाहन हटविण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या हद्दीतून उमरगा  सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता चौपदरीकरणाचे कर्नाटक सीमेपर्यंतचे काम कासवगतीने व निकृष्ट दर्जाचे आजही सुरूच आहे. कामाचा दर्जा निकृष्ट असल्याने झालेल्या रस्त्याच्या कामावर पुढचे काम सुरू असतानाच मागील झालेल्या रस्त्याच्या मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम झाले असून, दोन ठिकाणी तर या पूलाचा वापर करण्याअगोदरच हे पुल खचून बांधकामासाठी वापरलेल्या लोखंडी सळई उखडल्याने वाहनधारकांना येथून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

     या मार्गावर रात्रंदिवस धावत असलेल्या वाहनांना रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने खड्डे चुकविताना वाहन पलटी होणे, समोरासमोर धडक बसणे, खड्ड्यात वाहन अडकून बंद पडणे आदी कारणाने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक करणार्या वाहनांसह अन्य प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

        महत्वाचे म्हणजे डाळिंब गावा जवळील रस्त्याचे सुरू असलेले कामे निकृष्ट असल्याचे ग्रामस्थांच्या तक्रार आहेत. काळ्या मातीचा वापर, माती मिश्रित मुरमाचा वापर करून काम सुरू असल्याचे दिसून येते आहे.  डाळिंब गावात दहा दिवसांपूर्वी केलेला डांबरीकरण रस्ता पूर्णतः खचून दबला गेला आहे हे विशेष. तालुक्यातुन जानाऱ्या रस्त्याच्या कामावर गेल्या अनेक वर्षापासून वाढत्या तक्रारी आहेत. डाळिंब गावातील ग्रामस्थांनी काळ्या मातीचा वापर करून काम सुरू असतानाही हे काम अडविले होते. तरी परंतु वरिष्ठाकडून याकडे डोळे झाक होत आहे. काम जलद गतीने होण्यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घेऊन बैठका घेऊनही कसलीही सुधारणा होत नाही या मागचे गौड बंगाल लोकांना समजत नसल्याची चर्चा आहे.

        मागील आठ वर्षापासून महामार्गाच्या निकृष्ट संत गतीचे काम व ओव्हर ब्रिज अंडरपासच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सातत्याने धरणे, रस्ता रोको आंदोलने करण्यात आली आहेत .केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही याबाबत पत्राद्वारे, प्रत्यक्ष भेटून कल्पना देण्यात आलेली आहे. तरीही येथील महामार्ग शेजारील गावांसाठी अंडरपास व उड्डाणपुल बांधकामाची मंजुरी देण्यात आली नाही. मधल्या काळात लोकप्रतिनिधींनी टोल बंद  आंदोलन केल्याने महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराने त्वरित काम संपवण्याचे आश्वासन दिले व काम चालू केले पण आजही महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने चालत असून निकृष्ट स्वरूपाचे केले जात आहे. या निकृष्ट महामार्गाने आज तगायत अनेकांचा बळी घेतला असून कित्येक कुटुंबे उध्वस्त केले आहेत. आजही निकृष्ट कामाचा धडका चालूच असून प्रवासी वाहनधारकांवर मृत्यूची टांगती तलवार आजही लटकत आहे.

 

 

 

राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट कामाबाबत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यापूर्वी अनेकदा तीव्र आंदोलन करण्यात आले होते. मात्र कामाच्या दर्जाबाबत कसलीही सुधारणा झालेली नाही. लोकप्रतिनिधींनीही बैठक घेतलेली होती. गावातील सर्विस रोडवर अद्यापही काळ्या मातीचा वापर करून निकृष्ट काम होत आहे .गावात नवीन केलेले दहा दिवसांपूर्वीचे डांबरीकरण खचलेले आहे.

             बाबा जाफरी ( तालुकाध्यक्ष उमरगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Advertisement

Advertisement