Advertisement

 प्रजापत्र अग्रलेख- डोक्यात हवा गेल्यावर

प्रजापत्र | Monday, 06/11/2023
बातमी शेअर करा

एखादेवेळी एखाद्या मागणीसाठी कोणी एखाद्यासोबत उभे राहते आणि बोलाफुलाची गाठ पडावी तसे ते समर्थन वाढत जेते, पण याचा अर्थ हे समर्थन नेहमीच मिळत नाही असाही नसतो, आणि समर्थन मिळतेय म्हणून 'मी काहीही करू शकतो ' किंवा 'बघा मी काय करतो ' असली मग्रुरी देखील बरी नसते. आज गुणरत्न सदावर्ते जे काही बोलत आहेत, ते डोक्यात हवा घुसल्यासारखेच आहे. अगोदरच मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनामुळे निर्माण झालेली अस्वस्थता पुरेशी मिटलेली नसताना, आता सदावर्ते एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन संप सुरु करणार आहेत. आपल्या मागण्यांसाठी संप करणे हा कामगारांचा, कर्मचाऱ्यांचा अधिकार असला तरी तो कधी, केव्हा आणि कोणत्या वातावरणात करावा याचेही तारतम्य असायलाच हवे.
 

एसटी कर्मचाऱ्यांचे नेते झालेले , ज्यांनी एसटीमध्ये  एसटी कष्टकरी जनसंघाच्या नावाने संघटना उभी केले आहे असे गुणरत्न सदावर्ते यांनी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची हाक दिली आहे. मागच्या पंधरा दिवसात राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग  होती , त्यामुळे राज्यभरातच कमीअधिक फरकाने अस्वस्थ वातावरण होते. ते वातावरण आता कुठे काहीसे निवळू लागले आहे. या काळात एसटीचे झालेले नुकसान देखील मोठे आहे आणि एसटी बंद करावी लागल्याने सामान्यांना झालेला त्रास देखील खूप मोठा आहे. आणि अशा वातावरणात सदावर्ते यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची घोषणा केली आहे. पुन्हा एकदा यासाठी म्हणायचे की यापूर्वी देखील याच सदावर्ते यांच्या  पुढाकारातून ऐन दिवाळीतच एसटी कर्मचाऱ्यांचा राज्याच्या इतिहासातला सर्वात दीर्घकालीन संप झाला होता. आणि त्या संपात एसटीचेच कर्मचारी एसटी फोडासात असल्याचे बीभत्स दृश्य देखील पाहायला मिळाले होते. त्या संपाच्या काळात सुरुवातीच्या काळात सामान्य कर्मचाऱ्यांच्या मागण्या असल्याने मोठ्याप्रमाणावर कर्मचारी यात सहभागी झाले, मात्र नंतरच्या काळात संपकऱ्यानी जे काही केले त्यामुळे सामान्यांची, सामान्य समाजाची या संपाला असलेली सहानुभूती पूर्णपणे संपली होती. तरीही, गुणरत्न सदावर्ते यांची हटवादी भूमिका संपली नव्हती.

 

आता त्यावेळी सरकारने जे काही सांगितले, त्यातील अनेक गोष्टी अजूनही पूर्ण झाल्याचं नाहीत. काही मागण्यांच्या बाबतीत यश आले असले तरी अनेक प्रश्न नव्याने समोर येतच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सदावर्ते संप करणार आहेत. मुळात मागच्यावेळी राज्यातले सरकार वेगळे होते, आता सदावर्ते ज्यांचे लाडके आहेत असे बोलले जाते, त्या विचाराचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे खरेतर सदावर्ते यांनासंप करण्याची वेळच यायला नको. तरीही ते संप करणार आहेत, आणि त्यांनी त्यासाठी दिवाळीचीच वेळ निवडली आहे. याला ग्रामीण भाषेत वेशीत घोडे अडविणे असे म्हणतात . अगोदरच राज्यातील वातावरण अस्वस्थ आहे. सर्वच समाजघटक अस्वस्थ आहेत. मराठा. धनगर समाजाचे आरक्षणाचे विषय आहेत, शेतकरी दुष्काळाचा सामना करतोय, सामांन्य नागरिकांची क्रयशक्ती कमी झालेली आहे, बेकारी वाढत आहे आणि अशावेळी ऐन सण उत्सवात जीवन वाहिनी मानली जाणारी एसटी थांबवायची असेल तर ही सत्कार सोबतच समाजाची देखील अडवणूक आहे. आपण काहीही केले तरी त्याला समर्थन मिळते किंवा आपण चर्चेत राहतो या भावनेतून किंवा अशी हवा डोक्यात गेल्याने सदावर्ते काही करणार असतील तर त्यांना किती साथ द्यायची आणि सामान्यांच्या सण उत्सवाच्या काळात त्यांची अडवणूक करून नेमके काय सध्या करायचे हे आता एसटी कर्मचाऱ्यांनीच ठरविणे आवश्यक आहे. शेवटी ते देखील याच समाजाचा घटक आहेत आणि समाजाची सहानुभूती गमावून कोणतेच आंदोलन यशस्वी होत नसते. मग नेता भलेही कोणीही असेल. 

Advertisement

Advertisement