मुंबई - मराठाआरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती रविवारी चांगलीच खालावली आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असेही जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकातून भूमिका मांडली आहे. तसेच, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, असे म्हणत आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्र आणि राज्य सरकारवरही जबरी टीका केली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चुड लावीत आहेत. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवे. ओबीसी, आदिवासींसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे, असे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.