नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचं बटण दाबताच राज्यातील ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात नमो किसान महासन्मान निधी योजना सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील सुमारे १ कोटी १९ लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
या योजनेसाठी ९५ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी ८६ लाख ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यासाठी कृषी विभागाने १७२० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.
दरम्यान, अटींची पूर्तता न केल्याने काही शेतकऱ्यांना या योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करुन घ्यावी, असं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.