Advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना

प्रजापत्र | Wednesday, 25/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यानंतर आज  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  हे दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. काही वेळेपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले आहेत. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. 

अद्याप या दौऱ्याचे मूळ कारण समोर आले नाही आहे पण अचानक होत दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असणार आहे. मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि सगळ्यात महत्त्वाचे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकारण-समाजमन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आता आर-पारची लढाई सुरू केली  आहे. त्यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजीच संपली. त्यानंतर आजपासून पुन्हा एकदा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा करून आरक्षण मर्यादा वाढवावी अशी मागणी होत आहे. या मागणीने भाजपच्या नेतृत्वातील सरकारवर आरक्षण देण्याच्या भूमिकेवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. जरांगे यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांच्याकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.

 

मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार?
30 सप्टेंबर रोजी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली होती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. पितृपक्षाच्या पंधरवड्यानंतर राज्यात सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली होती. आता पितृपक्षानंतर नवरात्रोत्सव ही संपला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार का, याकडेही लक्ष लागले आहे. 

 

आमदार अपात्रता कारवाई?
आमदार अपात्रता कारवाई प्रकरणी सु्प्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत. 30 ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी काही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Advertisement

Advertisement