बीड: मागच्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये अस्वस्थ असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात गड बदलण्याची गरज व्यक्त केल्याने खळबळ माजली आहे. भगवानबाबांना सुध्दा दुसरा गड शोधावा लागला. कृष्णाला सुध्दा मथुरा सोडून द्वारकेत जावं लागलं. आता तुमच्या मनासारख राजकारण करायचय अशी घोषणा पंकजा मुंडेंनी केली आहे.
भगवानभक्ती गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात आता पंकजा मुंडेंनी थेट सरकारवर हल्ला चढविणारी भूमिका घेतली आहे. देशात सर्व आलबेल आहे का? शेतकरी सुखी आहे का? विमा मिळाला का? अनुदान मिळालं का? शेतमजुरांना शेतात काम आहे का? या प्रश्नांनी आपल्या भाषणाची सुरुवात केलेल्या पंकजा मुंडेंनी पक्षाबद्दलची नाराजी देखील व्यक्त केली.
मी विधानसभेत पडले. कुबडया पार्टी देऊ शकते नाहीतर , मला पब्लिकने कुबडया दिल्या, मी दोन महिन्यात मॅराथॉन पळायला सक्षम झाले. दर वेळी तुम्हाला आशा लागते, पण दरवेळी अपेक्षाभंग होतो. माझ्यात फक्त नितीमत्ता, हिंमत अन जनतेवरचा विश्वास.
पंकजा मुंडेंची निष्ठा लेचीपेची नाही. पद न देता निष्ठा काय असते ते माझ्या लोकांना विचारा. पराभव तर कधी देवांचेही झाले, आम्ही युध्दाला कायम तयार. त्रास देणारांच घरं उन्हात बांधु. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. शंकराला सुध्दा तिसरा डोळा आहे असा इशारा देखील पंकजा मुंडेंनी दिला.
राजकारणात नितीमत्ता राहिलेली नाही. तुमच्या मताला किंमत राहिलेली नाही, ती पुन्हा मिळवून देण्यासाठी, राज्याला स्थिरता देण्यासाठी मी काम करणार आहे. मी पडले आता मी पाडणार आहे असा एल्गार पंकजा मुंडेंनी केला.
जिंकण्यासाठी काहीही करु शकता पण नितीमत्ता गहाण ठेवू शकत नाही.
माझी निष्ठा, माझं सर्वस्व जनता आहे. जिथं तुमचं भलं होईल, तिथेच पंकजा मुंडे नतमस्तक होईल. पाच वर्षांत खूप काम केलं. भगवानबाबांना सुध्दा दुसरा गड शोधावा लागला. कृष्णाला सुध्दा मथुरा सोडून द्वारकेत जावं लागलं. आता जनतेला न्याय देणं हे माझं कर्तव्य. मी कोणाच्या इतरांच्या मतदारसंघात जाणार नाही. मी तुमचा स्वाभिमान गहाण पडू देणार नाही, त्यासाठीच मी मैदानात उतरलेय असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. यामुळे आता राजकारणात वेगळया समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.