Advertisement

“केंद्राने आणि राज्याने सर्वपक्षीय बैठक बोलवावी”

प्रजापत्र | Monday, 23/10/2023
बातमी शेअर करा

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यांवरून तापलं आहे. मराठा आरक्षणााठी मराठा समाज आक्रमक झाला असून त्याविरोधात ओबीसी समाजाने भूमिका घेतली आहे. तर, धनगर, लिंगायत आणि मुस्लीम समाजाकाडूनही आरक्षणाची मागणी जोर धरतेय. तर, दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अधिक व्यापक होत जातंय. आदी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्याकरिता सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“ड्रग्सबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय मत आहे, याचं उत्तर एका महिला लोकप्रतिनिधीला द्यावं”, असं सुप्रिया सुळे आज म्हणाल्या. ललित पाटील प्रकरणी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, गृहमंत्रालयाचं हे पूर्णपणे अपयश आहे. राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सरकार काय काम करतंय. चाललंय तरी काय. गृहमंत्री करतायत काय. अनेक गोष्टींत गृहमंत्रालयाचं लक्षच नाहीय. सरकारचा डेटाच सांगतोय की राज्यात गुन्हेगारी वाढतेय.

 

हे तर महाराष्ट्राचं दुर्दैवं
“बीड येथे झालेल्या घटनेवर गृहमंत्रालयाने उत्तर द्यावं. जे गृहमंत्री टीव्ही असायचे की मी तोंड उघडलं की असं होईल तसं होईल म्हणायचे, आम्ही वाट पाहतोय. ड्रग्समध्ये काय नेक्सस आहे? बीडमधील घटनेवर सरकार काय करणार आहे? ट्रिपल इंजिन सरकार पक्ष फोडणे, ईडी, सीबीआय, आयकर विभाग, खोक्याचा धदा करणे एवढंच करतंय. महाराष्ट्राचं हे दुर्दैवं आहे. आरोग्याच्या समस्या, नांदेडमधील घटना, शाळा कमी होतायत आणि दारूची दुकाने वाढतात. छत्रपती आणि शाहू- फुलेंचा हा महाराष्ट्र आहे का?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

 

राज्य प्रचंड अस्थिर
“अनेक घटक आरक्षण मागत आहेत. मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज आरक्षण मागत आहेत. याविषयी सातत्याने बाहेर बोलण्यापेक्षा विशेष अधिवेशन बोलवावं. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील वाद, रशियाचा वाद यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीने संसदेचं अधिवेशन किंवा सर्वपक्षीय बैठक सरकारने बोलवली पाहिजे. तसंच, महाराष्ट्रात आरोग्य, शिक्षण, आरक्षणाचे मुद्दे अशी गंभीर आव्हानं राज्यासमोर आहेत. त्यामुळे मला वाटतं की राज्य प्रचंड अस्थिर आहे. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Advertisement

Advertisement