पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे पहिल्यांदाच एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं. पुण्यातील बैठकीसाठी हे नेते एकत्र दिसले. त्याचा फोटोदेखील व्हायरल झाला आहे.
कुकडी आणि सीनाच्या पाणी प्रश्नासंदर्भात बैठकीच चर्चा झाल्याचं रोहित पवारांनी सांगितलं. बैठकीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले की, माझ्या मतदारसंघाचा विषय होता तो मी मांडला. ज्या गोष्टी हिताच्या आहेत त्या करुन घेतल्या याचं समाधान आहे. आम्ही लोकांसाठी कधीही राजकारण करत नाही.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी कधीही राजकारण करत नाही. विरोधकांनी एमआयडीसी अडवून प्रवृत्ती दाखवून दिली. मात्र आम्ही विरोधकांकडेही जातो आणि मदत मागतो.. विकासासाठी लाजत नाही आणि घाबरतही नाही.
अजित पवार आणि रोहित पवार हे राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच एकत्र आल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवारांनी २ जुलै रोजी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांना पुण्याचं पालकमंत्रीपदही मिळालं. फुटीनंतर रोहित पवारांनी टीकेची झोड उठवली होती. मात्र प्रत्यक्षात भेट झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.