बीड-मागच्या चार दिवसांपासून आयकर विभागाने सुरु केलेली छापेमारी संपल्यानंतर कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश आणि अर्चना कुटे यांनी आज पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना ते चांगलेच भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.ग्राहकांचा विश्वास आणि त्यांच्या प्रेमातून कधीही उतराई होता येणार नाही असे सुरेश कुटे म्हणाले.
पत्रकार परिषदेत श्री. कुटे यांनी,आमच्यावर झालेली छापेमारी माझ्यासाठी हा धक्का होता.17 वर्षात आम्ही ज्ञानराधाच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास जपला आहे.51 शाखेतून आम्हाला सर्वांनी खूप पाठिंबा दिला. हे कधीच विसरू शकत नाही. 40 वर्षात पहिल्यांदा असं घडलं की,आयकर विभागाचे अधिकारी यांनी आम्हाला छापेमारी सुरु असताना व्हिडिओ प्रदर्शित करण्याची चक्क संधी दिली. जे इतिहासात कधीच घडले नव्हते ते बीडमध्ये घडले आहे.माझा जीव चार दिवसात खूप कासावीस झाला. लोकांना भेटता येतं नव्हते. ग्राहक चिंतेत होते, पण काळजी करण्याची आता कोणालाही गरज नाही. आम्ही जे आहोत ते आपल्यामुळेच,आता सर्व सुरळीत होईल. उद्यापासून मी बँकेत पुन्हा सर्वांना भेटणार आहे. आज दोन तासात अनेक शाखांना भेट दिल्याचे त्यांनी सांगितले.
छापेमारी सुरु असताना अधिकाऱ्यांना आमचं घरही साध आहे.आम्ही साधी माणसं आहोत, हे नंतर कळाले.खरं तर आपल्या प्रेमाने आम्हाला मोठं केल पण आम्ही जमिनीशी नाळ जोडली आहे. अडचणीच्या काळात ग्राहकांनी आम्हाला खूप जीव लावला. यातून आम्हाला खूप शिकायला मिळालं.सर्वांच्या प्रेमामुळे आम्ही खूप भरवल्याचे सांगत सुरेश कुटे भावनिक झाले होते.
यानंतर अर्चना कुटे यांनी सांगितले, कुटे ग्रुप मी पाहते. आणि सुरेश कुटे हे बँक पाहतात. दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. इन्कम टॅक्सची तपासणी सर्वत्र होते, मात्र आमच्यासाठी हा धक्का होता. यातून आम्ही खूप मोठे माणसं झालो की काय असे वाटू लागले. यातून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.आपली माणसं ओळखता आली. तुमचा विश्वास आम्हाला बळ देणारा ठरल्याचे सांगत त्यांनी सर्वांचेच आभार मानले.