Advertisement

सर्व्हे करुन प्रगत ओबीसींना बाहेर काढा

प्रजापत्र | Saturday, 14/10/2023
बातमी शेअर करा

जालना - मनोज जरांगे पाटील यांची आज अंतरवाली सराटी गावात भव्य सभा पार पडत आहे. यावेळी त्यांनी समाजाशी संवाद साधला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झाले आहेत. यावेळी त्यांनी सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.

 

१. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन प्रत्येक मराठ्याचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा

२. कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशी देण्यात यावी

३. मराठा समाजासाठी बलिदान दिलेल्या ४५ बांधवांना सांगितलेला निधी, आणि कुटुंबाला सरकारी नोकरी द्यावी

४. दर दहा वर्षाला ओबीसी आरक्षण दिलेल्या बांधवांचा सर्व्हे करण्यात यावा. तो सर्व्हे करण्यात आलेला नाही. असा सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात

५. सरकारने मराठा समाजाला १० दिवसांत आरक्षण द्यावे

६. सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे सर्व प्रयत्न तातडीने मार्गी लावण्यात यावेत.

७. महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.

 

मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितलं की, 'सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ४० दिवसांचा वेळ दिला होता. त्याला आज ३० दिवस पूर्ण झालेत. आता १० दिवस सरकारच्या हातात आहेत. त्यामुळे आता तात्काळ आरक्षण देण्यात यावे. चाळीस दिवसानंतर आरक्षण दिलं नाही तर काय ते तुम्हाला सांगू, मराठे अंगावर घेऊ नका. त्यांच्या विरोधात जाऊ नका.' 

Advertisement

Advertisement