Advertisement

महिलांनो रस्त्यावर उतरा, केसेस टाकल्या तरी हरकत नाही..

प्रजापत्र | Wednesday, 11/10/2023
बातमी शेअर करा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार महिला मेळावा आज मुंबईत पार पडला. यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, खासदार सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. शरद पवार यांनी महिलांना अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. "समाजात चुकीचं काही दिसलं तर रस्त्यावर उतरा, सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका. सरकार बदलत असतं, आपण त्या केसेस मागे घेतो", असं शरद पवार म्हणाले. 

 

शरद पवार नेमकं काय म्हणाले? 
अनेक तास बसून देखील कुणी सभागृहाच्या बाहेर गेलं नाही. सर्वांनी संघटनात्मक कामाबाबतची भूमिका मांडली आणि ऐकूण देखील घेतली आहे. आपल्याला काही कार्यक्रम हाती घाययचे आहेत यामध्ये महिला आरक्षण, महागाई असे मुद्दे आहेत. आपण महिला आरक्षणाचा निर्णय घेतला होता.आरक्षण निर्णयामुळे स्पष्ट झालं की महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत. 

 

संरक्षण खात्यात महिलांना संधी 
आपण संरक्षण खात्यात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेकांचा विरोध होता. मात्र मी स्वतः मंत्री म्हणून तो निर्णय घेतला आणि आता तुम्हाला महिला सैन्यात दिसत आहेत. ही जमेची एका बाजूला परिस्थितीत आहे, दुसरीकडे मणिपूरसारखी घटना समोर येते. त्यामुळं आपल्याला जागरुक राहावं लागणार आहे. जर आता असा प्रकार कुठं घडला तर आपल्या भगिनी रस्त्यावर उतरायला हव्या. काय होईल तर ते केस टाकतील, विविध कलमे लावत असतात. तुम्ही चिंता करु नका, सरकार बदलत असते आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो.  

आता शाळा समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले यांनी विरोध असताना शाळा काढली आणि आता शाळा बंद करणं योग्य नाही. असं होतं असताना तुम्ही शांत बसत असाल तर हे योग्य नाही. सरकारी नोकरी कमतरता आहे. एका बाजूला नोकऱ्या नाहीत आणि दुसरीकडे रिक्त जागा मोठ्या आहेत. आणि सरकार कंत्राटी पदावर नेमणुका करत आहेत हे योग्य नाही. 

 

 

शाळांमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम का?
शाळा खाजगी कंपनीला देण्याचा यांनी निर्णय घेतला आहे. आता जी शाळा कंपनी दत्तक घेईल तिला तिचा वापर करता येईल. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्हयातील एक शाळा मद्य कंपनीला दिली आणि त्यांनी त्या शाळेच्या ग्राऊंडमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतला हे गंभीर आहे.

Advertisement

Advertisement