अफगाणिस्तानमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपातील बळींची संख्या वाढली आहे. या भूकंपात आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांचा बळी गेल्याची माहिती मिळाली आहे. तसंच यामध्ये 2,000 हून अधिक घरं उद्ध्वस्त झाली असल्याचं अफगाण सरकारने सांगितलं आहे.
अफगाणिस्तान नॅशनल डिझॅस्टर मॅनेजमेंट अथॉरिटीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. "आतापर्यंत या दुर्दैवी भूकंपामध्ये 4,000 नागरिकांचा बळी गेला आहे. सुमारे 20 गावांमध्ये जवळपास 1,980 घरं उद्ध्वस्त झाली आहेत." अशी माहिती ANDMAचे प्रवक्ते मुल्लाह सैक यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
शनिवारी (7 ऑक्टोबर) दुपारी अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतामध्ये 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. आजूबाजूच्या कित्येक प्रांतांमध्ये याचे धक्के जाणवले होते. या भीषण भूकंपानंतर सरकारने तातडीने बचाव आणि मदतकार्यास सुरुवात केली होती.
सध्या विविध संस्थांच्या एकूण 35 रेस्क्यू टीम्स भूकंपग्रस्त भागात मदत करत आहेत. यात एकूण 1,000 सदस्य असल्याची माहिती मुल्लाह यांनी दिली. अफगाणिस्तानचे कार्यवाहक पंतप्रधान मोहम्मद हसन अखुंद यांनी सोमवारी (9 ऑक्टोबर) भूकंपग्रस्त भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.