सत्ता हे साध्य नाही, साधन आहे, असलं काही सांगण्याचा काळ आता केव्हाच संपला आहे. आज असं कोणी सांगू जाईल तर त्याची वेड्यात गणना केली जाईल. आज सत्ता हीच विचारधारा झालेली असून त्यासाठी कालपर्यंत ज्यांना 'विठ्ठल' म्हटलं जायचं त्यांना हुकूमशहा ठरविताना देखील काहीच वाटतं नाही, इतका कोडगेपणा आजच्या राजकारणात आलेला आहे.
राष्ट्रवादीमध्येच वेगळी भूमिका घेत अजित पवार गट जेव्हा भाजपच्या वळचणीला गेला त्यानंतरचे काही दिवस, एकदा नव्हे तर दोनदा या गटाचे नेते आणि आमदार शरद पवारांच्या दर्शनाला गेले होते. इतकेच नाही तर नंतरचे काही दिवस आपल्या भाषणांमधून देखील हे आमदार आणि मंत्री 'शरद पवार हेच आमचे विठ्ठल आहेत' असे सांगताना थकत नव्हते. आता हेच विठ्ठल राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हुकूमशहा झाले आहेत. निवडणूक आयोगासमोर स्वत:च्या कृतीचे समर्थन करण्यासाठी आणि आपणच खरी राष्ट्रवादी आहोत हे सांगण्यासाठी शरद पवारांनी हुकूमशाही पध्दतीने नियुक्त्या केल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.
मुळात राष्ट्रवादीची सुत्रे निवडणूक आयोग कोणाकडे देतो हे काही काळात स्पष्ट होईलच. आजकाल निवडणूक आयोगासकट सर्वच केंद्रीय संस्था ज्या कणाहिन पध्दतीने वागत आहेत ते पाहता 'महाशक्ती'च्या प्रभावातून मुक्त निर्णय येईल अशी अपेक्षा करणे देखील भाबडेपणाचे ठरेल. निवडणूक आयोग काय निर्णय द्यायचा तो देईल, पण त्या अगोदर अजित पवार गटाकडून जे दावे केले जात आहेत त्याचे काय ? ज्या शरद पवारांशिवाय आमचे काहीच चालणार नाही असे कालपर्यंत सांगितले जात होते तेच आज शरद पवार हुकूमशाह आहेत, पक्षात अंतर्गत लोकशाही नाही असे सांगत आहेत. एकाच व्यक्तीने सर्व ठरवायचे आणि नियुक्त्या करायच्या हे लोकशाहीला घातक असल्याचे आता अजित पवार गटाला लक्षात येत आहे. मात्र याच एकाच व्यक्तीच्या आदेशावरून अजित पवारांना पक्षात अनेक प्रमाद माफ झाले होते. आज जे प्रफुल्ल पटेल माझ्याच स्वाक्षरीने सर्वांच्या नियुक्त्या झाल्या म्हणत आहेत, त्या पटेलांची नियुक्ती कोणी केली आहे ? राजकारणात सत्तेसाठीचे डावपेच सारेच करीत असतात , मात्र ते करतानाही, आपण अगदी कालपर्यंत काय बोलत होतो आणि आता काय बोलत आहोत ? आरोप नेमके कोणावर करीत आहोत याचे तरी भान ठेवले जायला हवे . शरद पवार म्हणजेच ज्यांचे सर्वस्व होते, त्यांना आज जर ते हुकूमशाह असल्याचा साक्षत्कार होणार असेल तर हा राजकीय कोडगेपणाचा कळस आहे.
राष्ट्रवादीची स्थापना शरद पवारांनी केली. राष्ट्रवादीची आज जी काही शक्ती आहे, त्यात त्या त्या भागातील उमेदवाराचे राजकीय वजन महत्वाचे आहेच, नाही असे नाही, मात्र त्या पलीकडे जाऊन शरद पवार या राजकीय ब्रँडची म्हणून जी काही किंमत आहे, त्याचा फायदा त्या उमेदवारांना झाला आहेच. हे नाकारता येणार नाही . मग आतापर्यंत ज्या ज्या वेळी शरद पवारांमुळे सत्तेचे लाभ मिळाले, सत्तेतली, विधिमंडळातली , संघटनेतली पदे मिळावी त्यावेळी कधी 'नियुक्ती पद्धतीने मिळालेले पद आम्हाला नको, हे लोकशाहीला धरून नाही ' असा साळसूदपणा कोणीच दाखविला नाही, मग आताच हे सारे का सुरु आहे? हा राजकीय कोडगेपणा लोकशाही व्यवस्थेला कोणत्या वळणावर नेऊन ठेवणार आहे ?