सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलंय. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आनंद मळाले असं आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे. ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. नांदेड जिल्ह्यात ते कर्तव्यावर असायचे. काही दिवसांपूर्वीच ते सोलापुरातील कुमठा नका परिसरातील त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हलवरने स्वत:वर गोळी झाडून घेतलीये.
आनंद मळाले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. पुढील परीक्षा देऊन त्यांनी काही दिवसांनी वाहतूक शाखा आणि सदर बाजार येथे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेडमध्ये त्यांची पदोन्नती झाली होती.
मळाले गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांना कामातील कोणत्यातरी गोष्टीचे टेंशन होते. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आनंद मळाळे यांनी आपले जीवन संपवले. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी विनंती नातेवाईकांनी केलीये.