नाशिक - एकीकडे कांद्याचा प्रश्न तिढत असताना आता टोमॅटोचे दरही कोसळले आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. याच प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाहन ताफा दिंडोरी-कळवण रस्त्यावर अडविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असून ओझर विमातळावरून दिंडोरीकडे जात असताना कळवण दिंडोरी रोडवर त्यांचा ताफा अडविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी शेतकऱ्यांनी ताफ्याच्या समोरच टोमॅटो कांदे फेकत अजित पवारांचे लक्ष वेधले. शिवाय शेतकऱ्यांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत, मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी संबंधित शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. कांदा निर्यात शुल्क मागे, टोमॅटोला चांगला भाव द्या, शेतकऱ्यांनी जगायचं कस, शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला.