मुंबई - राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज पहिलीच सुनावणी होत आहे. आयोगाच्या कार्यालयात स्वतः शरद पवार दाखल झालेले आहेत. तर अजित पवार गटाकडून उशिरापर्यंत कुणीही दाखल झालेलं नव्हतं. आज केवळ एकाच गटाकडून बाजू मांडली जाईल, असं सांगितलं जात आहे.
याच सुनावणीवरुन अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला असून आमच्याकडे संख्याबळ जास्त असल्याचं म्हटलं आहे. तटकरे म्हणाले की, प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी जे मुद्दे उपस्थित होतील, तेव्हा आम्ही भूमिका मांडत राहू. बहुतांश आमदार आमच्यासोबत आहेत. एवढंच नाही तर राज्यातील पदाधिकाऱ्यांनीदेखील अजित पवारांना समर्थन दिले आहे.
सुनील तटकरे पुढे म्हणाले की, फक्त राज्यातीलच नाही तर नागालँडच्या ७ आमदारांनी मुंबईत येऊन आम्हाला समर्थन दिलं आहे. सुनावणीत जे मुद्दे येतील, त्याची उत्तरं आमच्याकडे आहेत. जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात काय याचिका दाखल केली आहे, ते आम्हाला माहिती नाही.
काय म्हणाले सुनील तटकरे?
राष्ट्रवादी पक्षाची घटना ही पिरॅमिड सारखी आहे, शिवसेनेची वेगळी आहे.
आमच्या घटनेत निवडणुकीची प्रक्रिया आहे.
अजित पवार यांच्या निवडीबाबत सुनावणीत मुद्दा आलाच तर आम्ही उत्तर देऊ
राज्य आणि देशातील पक्षाचं संघटनदेखील आमच्यासोबत आहे.
आम्ही अध्यक्षांकडे याचिका केलेली आहे. दावे प्रतिदावे त्यांच्यासमोर मांडले जातील
आमच्याकडे ४३ विधानसभा सदस्य आहेत, हा आकडा जास्त देखील असू शकतो