लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे विविध पक्ष आणि नेते बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर 'INDIA' आघाडीतील दोन महत्त्वाच्या घटक पक्षांचे नेते आज एकत्र दिसले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, I.N.D.I.A. आघाडीच्या आगामी योजना आणि रणनीती आखण्याबाबत, या नेत्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या अधिकृत X हँडलवर या भेटीचे फोटो पोस्ट केले. "देशातील जनतेचा आवाज मजबुत करण्यासाठी मी आणि राहुल गांधी यांनी शरद पवारांची भेट घेतली. आम्ही प्रत्येक आव्हानासाठी तयार आहोत. भारत एकत्र होणार, इंडिया जिंकणार." असे कॅप्शन त्यांनी या फोटोसोबत लिहिले. यावेळी शरद पवारांसोबत जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते.