नेकनूर-१५ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनेवर तरतूद केलेल्या रक्कमेपेक्षा दीड लाख रुपये जास्तीचा खर्च दाखवून बिल उचलणे,कोणतीही खरेदी न करता दोन लाख रुपये उचलणे आणि ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि वार्डनिहाय ग्रामपंचायत सदस्याच्या आरक्षण सोडतीला उपस्थित न राहणे या व इतर बाबींसाठी दोषी धरून ग्रामसेवक बहिरवाळ बी.एन. (रा.मंजेरी) यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी तडकाफडकी निलंबित केले होते.यातील तक्रारदार असणाऱ्या शिवाजी दगडू शिंदे (वय-५० रा.नेकनूर) यांना आज (दि.५) दुपारी ग्रामसेवकाने आपल्या कारने उडवत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली.याप्रकरणात पेठ बीड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बहिरवाळ यांनी नेकनूर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत हद्दीमध्ये 7 लाख 53 हजार 517 रुपये खर्च केले. या रकमेवर 1 लाख 56 हजार 473 रुपयांचे आगाऊ बिल दाखवत ते स्वत: उचलत अपहार केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती.चौकशीअंती ग्रामसेवक बहिरवाळ दोषी आढळल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते.याचा राग मनात धरून गुरुवारी (दि.५)दुपारी ते नेकनूरवरून बीडकडे येत असताना बार्शी नाक्यावर शिवाजी दगडू शिंदे यांच्या दुचाकीला कारने धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत फिर्यादीने म्हटले आहे.यावेळी आरोपीने गावठी कट्टा दाखवून गोळ्या घालण्याची धमकीही दिल्याचे शिंदे यांनी पोलिसांना जबाबात म्हटले. घटनास्थळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी भेट दिली होती.याप्रकरणात ३०७ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जागडे हे करीत आहेत.
प्रजापत्र | Thursday, 05/10/2023
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा