आष्टी - अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गावर (दि.४) रोजी रात्री १० ते ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून चार ते पाच चारचाकी तर दुचाकी वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार घडला असून यामध्ये चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोरा चेक पोस्ट नांदूर फाटा जवळील श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंप शेजारी घडली आहे. या घटनेचे माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी धाव घेतली असता मात्र हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे, अंभोरा चेक पोस्ट जवळील नांदूर फाट्याजवळ या अगोदर अश्याप्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत.या ठिकाणी रात्रीचा फायदा घेऊन बलात्कार,लूटमार ,चोरीच्या अनेक घटना घडल्याचे प्रकार असतानाच बुधवारी रात्री अहमदनगरकडून जामखेडकडे येत असलेल्या चार ते पाच वाहनावर अचानक दगडफेक झाली यामध्ये जीवितहानी काही झाली नसली तरी या प्रकाराने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेचे माहिती अंभोरा पोलिसांनी देण्यात आली मात्र हल्लेखोर तोपर्यंत फरार झाले होते. अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील चेक पोस्ट या ठिकाणावरून हाकेच्या अंतरावर असताना देखील अशा घटना नेहमीच या ठिकाणी घडत आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी आणखी जास्तीच्या गस्तिची आवश्यकता असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. या घटनेतील वाहन चालक हे बाहेरील तालुक्यातील असल्याने एकानेही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र हा प्रकार पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. या महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या घटनेने प्रवासात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या ठिकाणी जास्तीचे गस्तीची व्यवस्था अंभोरा पोलीसांनी करणे याची आवश्यकता आहे.