Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - राष्ट्रवादीची कुरघोडी

प्रजापत्र | Thursday, 05/10/2023
बातमी शेअर करा

सत्ता ही बलाढ्य मधल्या बलाढ्य म्हणविणाराला देखील कशा तडजोडी करायला लावू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणून सध्याच्या महाराष्ट्रातील भाजपकडे पाहावे लागेल. अजित पवारांनी एका मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून आपली नाराजी काय व्यक्त केली, पुण्याच्या पालकमंत्री पदासह इतरही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचे गिफ्ट सरकारला अजित पवारांच्या पुढ्यात घालावे लागले. राज्याच्या सत्तेत ज्या ज्या वेळी अजित पवार सहभागी असतात त्या त्या वेळी ते मित्रपक्षांवर कुरघोडी करतात, हे काही दिवसांपूर्वी शिंदे गटच म्हणत होता, तरी देखील शिंदेंच्या सरकारमध्ये अजित पवारांना पायघड्या घातल्या गेल्याच आणि त्यांनी पालकमंत्र्यांच्या विषयात तरी इतरांवर कुरघोडी केली आहे.

 

      अजित पवार आणि सत्तेतली दादागिरी हे जणू समीकरणच झाले आहे. अजित पवार जेव्हा सरकारमध्ये असतात , त्यावेळी ते सरकारला त्यांना हवे तसे पळवितात, हा आजपर्यंतचा इतिहास. बरे हा इतिहास इतरांना माहित नाही असे नाही. यापूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेंव्हा असेल किंवा त्यापूर्वीच्या संपुआच्या सरकारमध्ये असेल, अजित पवार सुप्रिमोच्या भूमिकेत वागतात असे आरोप त्या त्या वेळी अनेकांनी केले होते. दूरचे कशाला, आज जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनीच आपण अजित पवारांच्या दादागिरीला वैतागून शिवसेनेतून वेगळी भूमिका घेत आहोत असे गळे काढले होते, त्याला फार काळ उलटलेला नाही. त्याच अजित पवारांसाठी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेंना पायघड्या घालाव्या लागल्या.
     अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदासोबतच अर्थमंत्री पद अनेकांचा विरोध असतानाही पदरात पाडून घेतले होतेच. राहिला होता तो पालकमंत्रीपदाचा प्रश्न, त्यात सरकारच्या पातळीवर फार काही होत नाही असे वाटताच अजित पवारांनी जे नाराजी नाट्य केले, आणि लगेच त्या नाराजीपुढे शिंदे आणि भाजपला नांग्या टाकाव्या लागल्या, यातूनच अजित पवार आजही इतरांवर कुरघोडी करण्यात यशस्वी झाल्याचे स्पष्ट आहे. पुण्याचे पालकमंत्रीपद तसे भाजपसाठी महत्वाचा विषय होताच. चंद्रकांत पाटील हे तसे थेट अमित शहांच्या मर्जीतले. त्यांना हटवून त्या जागेवर अजित पवारांची वर्णी लागावी म्हणजे भाजपला कोणत्या पातळीवरची तडजोड करावी लागत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. नव्याने जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीत अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ, धर्मराज बाबा आत्राम आणि अनिल पाटील अशा ७ मंत्र्यांना हवे ते जिल्हे मिळाले आहेत. केवळ छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांचे काय ते समाधान होऊ शकले नाही. मात्र युतीच्या राजकारणात थोडेबहुत नफा नुकसान सोसावे लागते ते भुजबळ आणि तटकरेंच्याच वाट्याला आले असे म्हणायला हरकत नाही. मात्र या साऱ्या प्रकारातून अजित पवारांनी आजही सत्तेत दादागिरी कोणाची चालते हेच दाखवून दिले आहे.
     मुळातच भाजपला लोकसभा निवडणुकीत कसेही करून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या भरवशावर ते सध्या होणार नाही याचा अंदाज आल्यानेच भाजपने अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला, किंबहुना हर प्रयत्नाने अजित पवारांना चुचकारुन आपल्यात घेतले. त्यामुळे आता अजित पवारांच्या नाकदुऱ्या काढणे, किमान लोकसभा निवडणुकांपर्यंत तरी भाजपची मजबुरी आहे आणि तोपर्यंत अजित पवार इतरांवर कुरघोड्या करीत राहणार हे देखील स्पष्ट आहे.

Advertisement

Advertisement