बीड : भाजपनेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर झालेल्या कारवाई नंतर राज्यभरातून मुंडे समर्थकांनी मदतीचे अभियान सुरु केले आहे. आतापर्यंत सात कोटीपेक्षा अधिकची रक्कम गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडे जमा झाली आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी आता हा निधी नको अशी भूमिका घेतली आहे. मला केवळ आशीर्वाद द्या असे भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे. त्यात त्यांनी ' माझ्या अडचणीत आपण सर्व उभे राहिलात यामुळे गहिवरून आले आहे. आपण ज्या पध्दतीने मदत देत आहात, ते खरच आपलं मोठेपण आहे. आपल्या घरातलं किडूक मिडूक विकून आपण जे मदत निधीवर शून्यावर शुन्य लावत आहात ते डोळे दिपवणारं आहे. पण आता तसं करु नका. यातून काय मार्ग काढायचा यासाठी मी वकीलांचे, सीएंचे सल्ले घेत आहे, त्यातून मी योग्य मार्ग काढेल. त्यामुळे तुम्ही मला पैसे देऊ नका, फक्त आशीर्वाद द्या... गोपीनाथ मुंडे साहेबांनी आपल्यात स्वाभिमान पेरला आहे. आपण त्याच स्वाभिमानाने या प्रसंगातून जाऊ. पण मी देणारी आहे. कितीही वाईट वेळ आली तरी आई आपल्या लेकराच्या ताटातलं घेत नाही. कोणी कितीही टिका केली तरी मी तूमच्या आईच्या भूमिकेत आहे. तूम्ही २० कोटीच काय ४० कोटी सुध्दा जमवाल , पण तुमच्या संसारातलं, तुमच्या लेकरांच्या लग्नासाठी ठेवलेलं असं मला नको... फक्त साथ, प्रेम आणि आशीर्वाद द्या' असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.