भूम : भूम येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 14 महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी नातेवाईकांनी योग्य वेळी ऑक्सिजन व उपचार न मिळाल्याचा आरोप ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांवरती केला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक इस्माईल मुल्ला यांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील भूम येथील रुग्णालयातील हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी 8 वाजुन 30 मिनिटांनी शेकापूर येथील सद्दाम पठाण यांची 14 महिन्याच्या मुलीला श्वास घेण्यासाठी त्रास होत होता.पठाण यांनी तात्काळ अगोदर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला श्वास घेण्यास त्रास होत आहे. ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले.
पठाण यांनी मुलीस लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्या मुलीला ऑक्सिजन लावण्यात आला नाही. ग्रामीण रुग्णालयात त्यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने सदरील मुलीला पंधरा ते वीस मिनिट कुठलेच उपचार भेटले नाहीत. त्यावेळी तेथे हजर असणाऱ्या परिचारिकेने सदरील मुलीवर वर उपचार करण्याचा प्रयत्न केला.
परिचारिकेने मुलीस ऑक्सीजन मशीन लावण्याचा प्रयत्न केला पण ती मशीन नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत त्या मुलीचा मृत्यू झाला होता असे त्यांच्या नातेवाईकांची म्हणणे आहे.
यानंतर मात्र भूम शहरातील काही समाजसेवक व त्यांच्या नातेवाईकांनी भूम ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. यांनी सदरील मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेऊन ठेवला.
याची माहिती मिळताच भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी साहेब यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर तब्बल दीड तासानंतर अतिरिक्त चार्ज असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोसावी भूम ग्रामीण रुग्णालयात आले. संतप्त नातेवाईकांनी त्यांच्यासमोर निष्काजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी लावून धरली. त्यांनी तात्काळ त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तरीही नातेवाईक आणि नागरिक ऐकत नसल्यामुळे भूम ग्रामीण रुग्णालयात भूममचे तहसीलदार सचिन खाडे हजर झाले. त्यावेळी खाडे यांनी मध्यस्थी करून नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण नागरिक आणि नातेवाईक ऐकायला तयार नव्हते. त्यावेळी धाराशिव जिल्हा प्रभारी जिल्हा।शल्य चिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला हे ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी नातेवाईकांना सदरील घटनेची संपूर्ण चौकशी करण्यासाठी कमिटी नेमून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शेकापूर तालुका भूम येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. इस्माईल मुल्ला यांनी संबंधित दैनंदिन हजेरी पत्रका वरती बऱ्याच दिवसापासून हजेरी नसल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ हजेरी पत्रक ताब्यात घेतली असून तसेच ग्रामीण रुग्णालयातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ग्रामीण रुग्णालयातील हात झालेला प्रकार हा पहिलाच नसून या अगोदरही एका मुस्लिम महिलेला केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आपला प्राण गमवावा लागला होता. याबाबतीत महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री कोणती कारवाई करणार याकडे भूम तालुक्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.