मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वीचे MPSC चे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर सेवानिवृत्त झाले आहेत. ते नोव्हेंबर २०२१ मध्ये या पदावर रुजू झाले होते. त्यावेळी, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तशी अधिसूचना काढली होती.
एमपीएसी आयोगाला पूर्ववेळ अध्यक्ष नव्हता. आयोगावर पूर्णेवेळ अध्यक्ष देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानंतर, राज्य सरकारने किशोर राजे निंबाळकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यानुसार, त्यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 6 वर्षासाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित झाला होता. अधिसूचनेत तसे नमूद करण्यात आले आहे. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी होते. मात्र, सेवा निवृत्त झाल्यामुळे पुन्हा ते पद रिकामे झाले होते.
निंबाळकर यांच्या सेवानिवृत्तीनंतर रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकदा टीका होत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीचा आता सुधारणा होईल का, हेच यानिमित्ताने पाहता येईल. कारण, रजनीश सेठ हे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आहेत.
दरम्यान, निंबाळकर यांच्या अगोदर सतीश गवई हे आयोगाचे पूर्णवेळ अध्यक्ष होते. ते ऑगस्ट २०२१ मध्ये निवृत्त झाले. त्यांतर, हे पद दयानंद मेश्नाम यांच्याकडे देण्यात आलं. ते निवृत्त झाल्यानंतर पुर्णवेळ अध्यक्ष म्हणून किशोर राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली होती. आता रजनशी सेठ यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. सध्या आयोगात एक अध्यक्ष आणि तीन सदस्य आहेत.