बीड-शहरातील पात्रूड गल्लीत काल रात्री किरकोळ वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला होता. शहरात सर्वत्र गोळीबाराची चर्चा सुरु असताना २४ तासाच्या आत बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या सहकऱ्यांनी आरोपीला पाली येथील एका धाब्यावरून रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले आहे.
मनोज दत्ताराव जाधव (वय 35 वर्ष, रा.पात्रूड गल्ली, माळी वेस बीड) याच्यावर आत्याचा मुलगा असलेल्यारि तेश विकास गायकवाडने गोळी झाडली होती. खाण्यासाठी भाकरी का मागितली या किरकोळ वादातून हा प्रकार घडला होता. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार एक फायर करण्यात आला आहे. जखमी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतात आरोपीने तेथून पोबारा केला. जखमीला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड शहर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अखेर आरोपीला पाली येथील एका हॉटेलवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी मुंबईला होणार होता फरार
पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रितेश हा घटनेनंतर मुंबईला पळून जाणार होता. रात्री पाली येथे एका हॉटेलवर तो असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री 8.30 वाजता त्याला ताब्यात घेतले आहे.