मुंबई - गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेच्या परंपरेचाच एक भाग असलेला शिवतीर्थावरील (शिवाजी पार्क) दसरा मेळाव्यावरून शिंदे गट व ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. यावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच खरी असून दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष झाले, तेव्हा एकनाथ शिंदे फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. ते नंतर आमदार, मंत्री झाले. त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे.
प्रत्येकाने एकमेकांचा आदर करावा
संजय राऊत म्हणाले, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आहे. याच शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष झाले तेव्हा एकनाथ शिंदे पक्षाच्या कार्यकारिणीतही नव्हते. ते तेव्हा फक्त ठाण्याचे नगरसेवक होते. नंतर उद्धव ठाकरेंनीच त्यांना आमदार, मंत्री बनण्याची संधी दिली. दरम्यान, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिंदे गटानेही महापालिकेकडे अर्ज केल्याचे वृत्त आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शिंदेंच्या वडिलांनी शिवसेना स्थापन केली का? प्रत्येकाने एकमेकांचा आदर राखला पाहिजे.