मराठी महिलेला मुंबईत घर नाकारण्यात आल्यानंतर आता त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरेंपासून अगदी पंकजा मुंडेंपर्यंत अनेकांनी या विषयावर भावना व्यक्त केल्या मात्र हा काही महाराष्ट्रातला पहिला प्रकार नक्कीच नाही. यापूर्वी कधी जातीच्या कारणावरून, कधी धर्माच्या कारणावरून जागा नाकारण्याचे प्रकार कमी घडलेले नाहीत. मुंबईत तर अमुक एका धर्माच्या व्यक्तींनी चौकशीही करू नये अशा पाट्या लावल्या गेल्या त्यावेळी मतांच्या राजकारणासाठी जर मौन पाळले गेले नसते तर आज ही विषवल्ली इतकी फोफावली नसती.
आपल्याकडे कोणत्याही गोष्टीला महत्व येण्यासाठी अमुक अशी वेळ यावी लागते. मुंबईत एका मराठी महिलेला घर नाकारण्यात आले आणि आता मनसेने त्यात आक्रमक पवित्रा घेतला. यामध्ये निश्चितपणे आगामी निवडणुका हेच कारण आहे. कारण मुंबईत अशी घटना काही पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वी जेंव्हा अनेकदा असे प्रकार घडले त्यावेळी राज ठाकरे काय किंवा इतर नेते काय यांनी मौन पाळले होते. अगदी आमच्या घरचे सोवळे बिघडविले म्हणून काम करणार्या महिलेला ज्यावेळी जाहीररीत्या अपमानित करण्यात आले त्यावेळी देखील राजकीय पुढार्यांनी थेट अशी भूमिका घेतली नव्हती. मुंबईतच कशाला अगदी आताच्या छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीच्या औरंगाबादेत जातीच्या कारणावरून जागा नाकारण्याचे प्रकार घडले होतेच. कदाचित या कारणावरचा राज्यातला पहिला एफआयआर देखील त्यावेळच्या औरंगाबादमधीलच असेल. मात्र त्यावेळी या विषयावर गांभीर्याने भूमिका घ्यावी असे कोणालाच वाटले नाही.
जातीयवाद असेल, धर्मवाद असेल किंवा प्रांतवाद असेल याला गोंजारण्यचे काम त्या-त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या परीने केले आहे. याला काही सन्माननीय अपवाद असतीलही, नाही असे नाही पण त्या अपवादाची संख्या अर्थातच बोटावर मोजण्या इतकी. त्यापलिकडे जावून समाजाने नियम म्हणून पाळले काय असेल तर जातीवादाच्या, प्रांतवादाच्या आणि धर्मवादाच्या चौकटी अधिक पक्क्या केल्या. ज्यावेळी सुरूवातीलाच मांसाहार करणार्यांना या सोसायटीत जागा नाही असे बोर्ड लागले होते खरेतर त्याचवेळी व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून प्रत्येकालाच चिड यायला हवी होती पण त्याकडे धर्माच्या आणि कथित संस्कृतीच्या चष्म्यातून पाहिले गेले. या विकृत मानसिकतेला विरोध करावा तर कथित उच्चवर्णीयांची मते मिळणार नाहीत म्हणून राज्यकर्त्यांना या विषयाशी देणे घेणे नव्हते. त्यातूनच मग कधी एखाद्या धर्माला विरोध, कधी एखाद्या जातीला विरोध, कधी अमुक आहार करणार्यांना विरोध तर कधी तमुक पेहराव करणार्यांना विरोध असली सडक्या मानसिकतेची डबकी ठिकठिकाणी साचत गेली आणि त्यातूनच मग आता जातीवाद, प्रांतवाद, धर्मवादाची विषवल्ली मानवतेलाच गिळू पाहत आहे. आज मुंबईच्या विषयावरून अनेकांना कंठ फुटला. राज ठाकरेंनी आपल्या पद्धतीने समाचार घेतला, मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडेंनी मला देखील हाच अनुभव आला होता असे आज इतक्या वर्षानंतर का होईना सांगितले याचे स्वागतच करायला हवे. पण जर समाजातील धुरिण म्हणविणारे हे सर्व सहन करणार असतील तर बदलाची सुरूवात करायची कोणी?