शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. गेल्या वर्षी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून महिनाभरापूर्वीच अर्ज करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार? शिवसेना शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? महापालिका प्रशासन कोणाच्या बाजूने निर्णय देणार, याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिका प्रशासनासमोर पेच अन् विधी विभागाचा अभिप्राय
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गटाकडून महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. एक महिन्यांपूर्वीच हा अर्ज करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. एकनाथ शिंदे गटानेही शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला आहे. दोन्ही गटाचे अर्ज आल्याने महानगरपालिका प्रशासन सावध झाले आहे. मागील वर्षीही असाच वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेने विधी विभागाकडून अभिप्राय मागितला आहे, असे समजते. त्यामुळे यावेळी कोणाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळते हे पाहावे लागणार आहे.