Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - अरण्यरुदन

प्रजापत्र | Wednesday, 27/09/2023
बातमी शेअर करा

    क्षमता असतानाही कोणी वेळेवर निर्णय घेणार नसेल आणि नंतर एखाद्या प्रसंगाच्या संदर्भाने व्यथा मांडणार असेल तर त्याला व्यावहारिक जगात फारसा अर्थ नसतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला किती डावलले जात आहे किंवा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे याची जाणीव होत असतानाही कुठलीच भूमिका घ्यायची नाही, आणि नंतर केवळ खंत व्यक्त करायची, याला अरण्यरुदन म्हणतात, कारण असली खंत कोणी एकूण घेत नसते, किंवा असली खंत व्यक्त करण्याचा जगावर काहीच परिणाम देखील होत नसतो. पंकजा मुंडेंना हे कळत नसेल असे नाही, मात्र त्यांच्याकडून होणारी कृती ही असे अरण्यरुदन वाटावे अशीच आहे.

 

 

     विरोधी पक्षांना केंद्रीय संस्थांचा वापर करून नामोहरम करायचे, त्रस्त करायचे आणि आपल्या वळचणीला यायला भाग पडायचे यात भाजपचा हातखंडा आहे. याच मार्गाने भाजपने आतापर्यंत अनेकांचे प्रवेश घडवून आणले आहेत. मात्र जे भाजपमध्ये आहेत, त्याच्या संस्थेवर जेंव्हा केंद्रीय यंत्रणा कारवाई करते, त्यावेळी त्याची चर्चा होणारच. सध्या पंकजा मुंडेंच्या बाबतीत हीच चर्चा सुरु आहे. १९ कोटीची जीएसटी थकविली म्हणून पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्याची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आता यात एक सूर असाही निघू शकेल, की पंकजा मुंडेंनी थकबाकी ठेवायचीच कशाला, वगैरे. त्यांनी त्रुटी ठेवल्या नसत्या तर ही वेळ आलीच नसती असेही बोलले जाईल, ते अयोग्य आहे असेही नाही. वैद्यनाथ कारखान्याची आज जी अवस्था आहे, त्याला नैसर्गिक कारणांसोबतच गैरव्यवस्थापन देखील तितकेच जबाबदार आहे हे नाकारतात येणार नाही. मात्र अशी अवस्था असणारा "वैद्यनाथ" हा काही राज्यातला एकमेव कारखाना नक्कीच नाही. राज्यातल्या अशा अनेक कारखान्यांना काय किंवा सूतगिरणी किंवा इतर सहकारी प्रकल्पांना काय, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मदत करीत आले आहे. आता देखील राज्यातील काही कारखान्यांना प्राप्तिकराच्या सवलती देण्यात आल्या, कांहीं कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले, पण या यादीत वैद्यनाथचा समावेश होऊ शकला नाही. राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेत आहे आणि पंकजा मुंडे भाजपच्या तशा मोठ्या नेत्या आहेत, तरीही असे होत असेल तर भाजपने पंकजांवर बहिष्कार टाकला आहे इतकाच याचा अर्थ आहे.

 

 

वैद्यनाथवरील कारवाई हे काही भाजप पंकजांना सुरक्षित अंतरावर ठेवत आहे, किंवा अस्वस्थ करीत आहे हे सांगण्याचे एकमेव उदाहरण नक्कीच नाही. यापूर्वी अनेकदा भाजपने आपल्या पक्षाला पंकजांची किंमत काय आहे हे दाखवून दिले आहेच. त्या प्रत्येकवेळी पंकजा मुंडे तलवार उगारतात आणि नंतर म्यान करतात. त्यामुळे आता भाजपने पंकजा मुंडेंना गृहित धरले आहे. आपण काहीही केले तरी पंकजांना आपल्याशिवाय पर्याय नाही, आणि त्या दुसरा काही निर्णय घेऊ शकत नाहीत हे भाजपला पक्के समजून चुकले आहे किंवा भाजपने तसे गृहीत धरलेले आहे. त्यामुळे आता वैद्यनाथवरील कारवाई नंतर माझ्या कारखान्याला मदत मिळाली नाही असली व्यथा पंकजा मुंडे मांडत असतील तर त्याला अर्थ काय राहणार आहे.

 

 

      राजकारण असेल किंवा व्यवसाय, योग्य वेळी निर्णय घेण्याला फार मोठा अर्थ असतो. त्यातही तुमच्या निर्णयावर जेव्हा अनेकांचे भवितव्य अवलंबून असते , त्यावेळी तरी तुम्ही निर्णय घेताना वेळ दवडली नाही पाहिजे . कारण लोक तुमच्यावर अवलंबून असतात आणि तुम्ही वेळेवर निर्णय घेतल्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात. पंकजा मुंडेंच्या अनेक कार्यकर्त्यांना ते तसे भोगावे लागले , त्यामुळे आता वेळ पंकजा मुंडेंची आहे. आताही त्या केवळ व्यथा मांडणार असतील किंवा खंत व्यक्त करणार असतील तर काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणाला माफ देखील करीत नाही हे ही लक्षात असावे.
 

Advertisement

Advertisement