महाराष्ट्राच्या सत्तेत सुरुवातीला शिंदेंना दिलेले मुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर अजित पवार गटाला सहभागी करीत उपमुख्यमंत्रीपद आणि काही मंत्रिपदाची त्यांना दिलेली बिदागी यामुळे १०५ आमदार असलेल्या भाजपच्या वाट्याला राज्यात असेही फारसे काही आलेले नाही. त्यातच आता पुन्हा आणखी १० आमदार भाजपात प्रवेश करण्यास तयार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत. कदाचित तसे होईलही, मात्र हे प्रवेश होणार म्हणजे पुन्हा त्या नव्याने येणारांना काही तरी द्यावे लागणारच , मग सारे काही बाहेरून आलेल्यांनाच मिळणार असेल तर भाजप पक्षातल्या निष्ठावंतांचे काय करणार आहे ?
शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात शिवसेना (उबाठा ) गटाने दाखल केलेल्या अपात्रतेची याचिकेवर निर्णय घेण्याच्या मुद्द्यावरून खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच कान उघाडणी केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना तातडीने हालचाली करणे आवश्यक आहे. त्या दिशेने पाऊले उचलली जायला सुरुवात देखील झाली आहे. जर सारे काही कायद्याला अभिप्रेत असेच आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सर्वोच्च न्यायालयाने जी भूमिका घेतली आणि केवळ निवडून आलेले आमदार म्हणजे मूळ पक्ष नव्हे असे जे सांगितले , त्याचा आदर आणि पावित्र्य जर निर्णय प्रक्रियेत राखले गेले तर एकनाथ शिंदेंसह १६ जण अपात्र होतील यात कसलीच शंका नाही. त्यामळे येत्या काही दिवसात, कदाचित येणाऱ्या नवरात्रोत्सवात राज्यात वेगळेच घट बसलेले असतील. त्यामुळे आज घडीला शिंदे गट मोठ्याप्रमाणावर अस्थिर आणि अस्वस्थ आहे. असे असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणखी १० आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांना शरद पवारांच्या ताब्यातील राष्ट्रवादीचा असत पाहायचा आहे. अर्थात हे कोणाच्या इच्छेवर नसते, तर जनता ठरवीत असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे काय व्हायचे ते होईल, पण आता नव्याने ज्यांना कोणाला भाजप पक्षात घेणार आहे, त्यांना घेताना मूळ भाजपेयींचें काय ?
जे भाजपच्या तिकिटावर मागच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले , त्यातही ऐनवेळी पक्षात प्रवेश करणारे विखेंसारखे आयाराम जयराम अनेक होते . मात्र इतके करूनही भाजप १०५ वरच अडकला आणि सत्तेचे स्वप्न दुभंगले. त्यानंतर पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचे आलेले सरकार आणि ते सरकार पडून शिवसेना फोडत एकनाथ शिंदे गटासोबत भाजपने केलेली सोयरीक, यामुळे म्हणायला आज भाजप सत्तेत आहे , पण या सत्तेचा मूळ भाजपवाल्यांना किती फायदा झाला ? एकतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अनेक जागा अजूनही रिक्त आहेत. अगोदर दोघांचे सरकार होते, त्यात आता अजित पवार गट हा तिसरा वाटेकरी आला आहे. त्यामुळे उरलेल्या जागांमध्ये देखील तीन वाटे होतील. मग १०५ आमदार असलेल्या पक्षाच्या वाट्याला त्यातही येणार तरी काय ? आणि त्यात समाधान कोणाकोणाचे करणार ? इयर पक्षातून आलेले आज मंत्रिपदाच्या खुर्च्या उबवत असलेले पाहून मूळ भाजपेयींना वाटत असलेली अस्वस्थता मोठी आहे. मात्र बोलायची सोय नाही. सर्वांनाच इडी , सीबीआय, आयकर विभाग असल्या संस्थांची भेटी आहेच. त्यामुळे पक्ष ज्या कोपऱ्यात फेकेल तिकडे गुमान बसने नशिबी आलेल्या भाजपच्या आपल्या निष्ठावंतांचा आता तरी विचार होणार का ? राज्यपाल नियुक्त आमदारांच्या ज्या १२ जागा आहेत, त्यातही आता तीन हिस्सेकरी आहेत, जोडीला भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसंग्राम, रिपाई यांचाही दावा आहेच, मग जर सत्तेचे सर्वच लाभ बाहेरच्यांना, किंवा बाहेरून पक्षात येऊन शिरजोर झालेल्यांना होणार असतील, पक्षातल्या मूळ लोकांनी, ज्यांनी पक्षासाठी आतापर्यंत खस्ता खाल्ल्या . लोकांनी हिनवले सहन केले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना विरोध करण्यासाठी प्रसंगीं अंगावर गुन्हे घेतले, आज त्याच पक्षातून आलेल्यांसाठी टाळ्या वाजविण्याची वेळ मूळ निष्ठावंतांवर येणार असेल तर असा काँग्रेसीभाजप बावनकुळेंना अपेक्षित आहे का ?