भारतात होणाऱ्या विश्वचषकाला बोटावर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. क्रिकेटचा सर्वात मोठा महासंग्राम 5 ऑक्टोबर रोजी सुरु होणार आहे. या मेगा इव्हेंटआधी २९ सप्टेंबरपासून सराव सामने होणार आहेत. प्रत्येक संघाला दोन दोन सराव सामने खेळायला मिळणार आहेत. त्यासाठी प्रत्येक संघ एक आठवडा आधीच भारतात दाखल होऊ शकतो. भारताचा शेजारी पाकिस्तान संघातील खेळाडूंना अद्याप व्हिसा मिळालेला नाही. व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले जाऊ शकते.
यंदाचा वनडे विश्वचषक राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवला जाणार आहे. टीम इंडियासह दहा संघ यामध्ये सहभागी होणार आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतात पाकिस्तानला अद्याप भारतात येण्यासाठी व्हिसा मिळालेला नाही. पाकिस्तान वगळता इतर अठ संघांना भारतात येण्यास व्हिसा मिळाला आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, विश्वचषकासाठी भारतात रवाना होण्यापूर्वी पाकिस्तानने दुबईत सराव करण्याची योजना आखली होती. यानंतर ते तेथून थेट हैदराबादला पोहचणार होते. मात्र व्हिसा न मिळाल्याने त्यांचा प्लॅन फिस्कटला आहे.
आठवड्याभरापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाने भारताच्या व्हिसासाठी अर्ज केला होता. पण अद्याप त्यांना व्हिसा मिळाला नाही. आता पाकिस्तान संघ २७ सप्टेंबरला दुबईला रवाना होईल आणि त्यानंतर तेथून भारतात येईल. व्हिसाला झालेल्या विलंबाबाबत पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाने संयमी भूमिका घेतली आहे. निर्धारित वेळेत व्हिसा मिळेल, अशी आशा पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. पाकिस्तान संघाला २९ सप्टेंबर रोजी हैदराबाद येथे न्यूझीलंडविरोधात सराव सामना खेळायचा आहे.
नसीम शाह आऊट, हसन अली याला संधी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी १५ शिलेदारांची घोषणा केली आहे. २२ सप्टेंबर रोजी पीसीबीने ट्वीट करत खेळाडूंची नावे जाहीर केली. दुखापतीमुळे नसीम शाह याला विश्वचषकात खेळता येणार नाही. त्याच्याजाही असन अली याला संधी देण्यात आली आहे. नसीम शाह याला आशिया चषकात दुखापत झाली होती. त्यामुळे तो स्पर्धेबाहेर गेलाय. शादाब खान, मोहम्मद नवाज आणि उसामा मीर या तीन फिरकी गोलंदाजांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तानी संघ :
बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, हसन अली, इफ्तिखार अहमद, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान, सलमान आगा, शादाब खान (उप-कर्णधार), मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, उसामा मीर, मोहम्मद वसीम जूनियर, सऊद शकील, हॅरिस रौफ.