नागपूर- नागपुरातील मुसळधार पावसाने धुमशान घातलं आहे. धुंवाधार पावसाने नागपुरातील रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे तर अनेक भागांत पावसाचं पाणी साचलं आहे. तर, अनेकांच्या घरातही पाणी शिरलं आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
43 इंच टीव्हीवर उत्तम ऑफर- फिचर्स आणि आकारातही सरस
एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर, मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.
नागपूर शहराच्या विविध भागात २ एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वृद्ध नागरिकांना सर्व ती मदत तातडीने द्या, असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.