Advertisement

दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करा

प्रजापत्र | Friday, 22/09/2023
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर - अपुऱ्या पावसामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट असून, खरिपाची पिके हातची गेली आहेत. संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील १५५५ शेतकऱ्यांनी गेल्या आठ महिन्यात आत्महत्या केल्या. आत्तापर्यंत केवळ ३८ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. मोठ्या धरणात ३८ टक्क्यांखाली तर छोट्या प्रकल्पामध्ये १८ ते २२ टक्के पाणी आहे.

त्यामुळे आगामी काळात पिण्याचे पाणी, चाराटंचाईचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. राज्य सरकारने कर्नाटकाप्रमाणे राज्यात दुष्काळ जाहीर करून हेक्टरी २५ हजारांची मदत जाहीर करावी, अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (ता.२२) केली.

पत्रकार परिषदेत श्री. वडेट्टीवार पुढे म्हणाले, गतवर्षी अतिवृष्टीमुळे तर यंदा अत्यल्प पावसामुळे मराठवाड्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेची २०१७ मध्ये घोषणा करण्यात आली पण फक्त २५ टक्के लोकांना त्याचा लाभ मिळाला. अनेक शेतकऱ्यांकडे पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कर्जमुक्तीचे पत्र आहेत, पण त्यांचे कर्ज कागदोपत्री सुरूच आहे.

त्यावर चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारले जात आहे. २०२१-२२ मध्ये अतिवृष्टीत चार लाख ७३ हजार हेक्टर जमीन उद्ध्वस्त झाली. आमच्या सरकारने मदत जाहीर केली, पण नंतर सरकार बदलले व केवळ सव्वालाख शेतकऱ्यांना मदत मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकार गंभीर नसल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

 

 

Advertisement

Advertisement