Advertisement

भर संसदेत भाजप खासदाराचा गावगुंडानाही शोभणार नाहीत अशा शिव्यांचा पाऊस

प्रजापत्र | Friday, 22/09/2023
बातमी शेअर करा

नवी दिल्ली - देशाचा राजकारभार नव्या संसदेतून सुरु झाला असला, तरी लोकनियुक्त खासदारांच्या वर्तनात आणि द्वेषपूर्ण भाषेचा बेलगाम वापर कायम आहे याचीच प्रचिती आज आली. लोकसभेच्या कामकाजादरम्यान दिल्ली भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे दानिश अली यांना 'दहशतवादी' म्हणून संबोधले. रमेश बिधुरी यांनी अनेक शिव्यांची लाखोली भर संसदेत वाहिली. संसदेत महिला खासदार बाजूला आहेत याचंही त्यांना भान राहिलं नाही. गावगुंडांकडूनही शब्द वापरले जाणार नाहीत, अशा पद्धतीने अपशब्द वापरल्यानंतर विरोधकांनी भाजपविरोधात हल्ला चढवला. एका लोकनियुक्त खासदाराला भर संसदेत शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  

 

दानिश अलींचाच नाही, तर आपल्या सर्वांचा अपमान 
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, भाजप नेत्याची टिप्पणी अत्यंत निषेधार्ह आहे आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली असली तरी ती अपुरी आहे. ते पुढे म्हणाले की, "रमेश बिधुरी यांनी दानिश अलींबद्दल जे काही बोलले ते अत्यंत निषेधार्ह आहे. त्यावर जितकी टीका केली जाईल तितकी कमी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली आहे पण ती अपुरी आहे. अशी भाषा मी कधी ऐकली नाही. संसदेच्या आत असो किंवा बाहेर अशी भाषा वापरु नये.हा फक्त दानिश अलींचाच नाही, तर आपल्या सर्वांचा अपमान आहे. नव्या संसदेची सुरुवात बिधुरी आणि त्यांच्या बोलण्याने झाली आहे. यावरून भाजपचा हेतू दिसून येतो. बिधुरी जे बोलत आहेत ते भाजपचे शब्द आहेत. मला वाटते की हे निलंबनासाठी योग्य आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी."

 

बिधुरी यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना, राजद खासदार मनोज झा म्हणाले की, "मला दुःख झाले आहे. परंतु, आश्चर्य वाटले नाही. ते पुढे म्हणाले की, "पंतप्रधानांच्या 'वसुधैव कुटुंबकम्'चे हे सत्य आहे. संसदेत खासदारासाठी असे शब्द वापरले गेले असतील तर मुस्लिम, दलित यांच्या विरोधात कोणत्या भाषेला वैधता देण्यात आली आहे, याचा विचार करायला हवा. रमेश बिधुरी यांच्यावर पंतप्रधान एक शब्दही बोलू शकले नाहीत." दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावरील पत्रकार परिषदेत या विषयावर भाष्य करण्यास सांगितले असता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा संसदेचा विषय असल्याचे सांगून यावर भाष्य करण्यास नकार दिला.

Advertisement

Advertisement