मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सुनावणी घेण्यास विलंब होत असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कामाला लागलेत. त्यांनी दिल्लीत जावून तेथील कायदेतज्ज्ञांशी या प्रकरणी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी पुढील आठवड्यात सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असे स्पष्ट सांगितले आहे.
राहुल नार्वेकर गुरुवारी दुपारी नवी दिल्लीला गेले होते. त्यानंतर त्यांच्या दौऱ्याबाबत वेगवेगळ्या अटकळी सुरू झाल्या. त्यातच राहुल नार्वेकर यांनी स्वतः शुक्रवारी दिल्लीत आपण कुणाला भेटलो व त्यात नेमकी कोणती चर्चा झाली याचे स्पष्टीकरण दिले.
अनेक मुद्यांवर तज्ज्ञांशी चर्चा
राहुल नार्वेकर म्हणाले की, माझी काही कायदेतज्ज्ञांशी चर्चा झाली. एकूणच अपात्रतेचा विद्यमान कायदा बदलत जाणारा आहे. या कायद्यात परिस्थितीनुरुप बदल होतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे अथवा या कायद्याची अंमलबजावणी कशाप्रकारे होणे आवश्यक आहे आदी अनेक मुद्यांवर माझी विविध तज्ज्ञांशी चर्चा झाली.
पुढील आठवड्यात सुनावणी घेऊ
सुप्रीम कोर्टाने आम्हाला एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिलेत. तशी आमची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी झाली आहे. आमची पूर्वनियोजत सुनावणीही होतीच. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
गरज पडल्यास ठाकरे - शिंदेंना बोलावणार
या प्रकरणी गरज पडली तर पक्षाच्या प्रमुखांनाही बोलावण्यात येईल, असे नमूद करत विधानसभा अध्यक्षांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावण्यासंबंधी सूचक विधान केले.
अजित पवार गटाची तक्रार आली का?
पत्रकारांनी यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून काही तक्रार आली आहे का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादीकडून यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या याचिकांचीच आपल्याला माहिती असल्याचे स्पष्ट केले.