Advertisement

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तिघांना सायबर पोलिसांनी जम्मू काश्मीरात पकडले

प्रजापत्र | Saturday, 16/09/2023
बातमी शेअर करा

बीड - सिमेंट खरेदीच्या व्यवहारात ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातांवर बीड सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात बीड येथील सायबर क्राईमच्या टीमने जम्मु काश्मीर येथे जावून तिघांना पकडले. या तीनही आरोपीना अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूरयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

अंबाजोगाई येथील सदर बाजार परिसरातील सिमेंटचे होलसेल व्यापारी सिताराम तात्याराम माने यांनी 2022 मध्ये केंद्रेवाडी येथील शाळेच्या बांधकामासाठी इंडिया मार्ट डॉटकॉमवर 520 अल्ट्राटेट सिमेंट बॅगची मागणी केली. त्यानंतर त्यांना ******4548  या मोबाईल क्रमाकांवरून फोन आला, मी अल्ट्राटेट कंपनीचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले. 500 बॅग प्रत्येकी 230 प्रमाणे जीएसटीसह 1 लाख 15 हजारांची पावती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. समोरच्या व्यक्तीने दिलेले कोटक महिंद्रा बँक खाते क्रमांक ******8456 यावर दुकानाच्या नावे असलेल्या खात्यातून 1 लाख 15 हजार रुपये पाठवले. मात्र माने यांना सिमेंट प्राप्त झाले नाही. त्यांनी सात-आठ महिने ज्यांना पैसे पाठवले त्या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना ना माल मिळाला ना त्यांना पैसे परत मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर माने यांनी 13 एप्रिल 2023 रोजी बीड सायबर पोलीसात धाव घेत फिर्याद दिली.  या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दालख करण्यात आला. त्यानंतर सायबर ठाण्यातील उपनिरीक्षक शैलेश जोगदंड यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करताना ज्या खात्यावर पैसे गेलेले आहे, ते पंकज चमनलाल मेहरा (वय 29 रा.कठुआ जम्मू काश्मीर) यांचे खाते फ्रिज केले. या खात्यावरुन 11 ऑक्टोबर 2022 रोजी 50 हजार, 80 हजार या प्रमाणे करणकुमार सुभाषकुमार (वय 28 रा.कठुआ जम्मू काश्मीर) यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याने निदर्शनास आले. तेही खाते सायबर टिमने फ्रिज केले. तसेच यात वापरलेले सीमकार्डही दुसर्‍यांच्या नावे असल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलीसांनी जम्मू काश्मीर येथे जावून पंकज, करणकुमार यांच्यासह रामरंजनकुमार छोटेलाल (वय 30 रा.कुरकिहर बाजरगंगा जि.गया राज्य बिहार) यास जम्मू काश्मीर पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले. त्यांना अटक करुन 16 सप्टेंबर रोजी अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी खान साहेब, प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड, पोह.भारत जायभाये, अन्वर शेख, बप्पासाहेब दराडे, प्रदिप वायभट यांनी केली.

Advertisement

Advertisement