छत्रपती संभाजी नगर - मराठवाड्याला यंदा चांगली मंत्रिपदे मिळाली आहेत. मात्र, मंत्रिपदे नुसती भूषवायची नसतात. मंत्रिपदाचा फायदा घ्या, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील मंत्र्यांना आज खडेबोल सुनावले.
छत्रपती संभाजीनगरमधील वंदे मातरम सभागृहात विविध कार्यक्रमांचे उद्घाटन तसेच काही विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. यावेळी अजित पवारांनी आपल्या रोखठोक भाषणातून मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना काही सूचना करत त्यांना खडेबोलही सुनावले.
कामांचे नियोजन करत जा
अजित पवार म्हणाले, मराठवाड्यात अतुल सावे यांच्याकडे गृहनिर्माण खाते आहे. त्यांनी शहरात चांगल्या हाऊसिंग सोसायटी व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले पाहीजे. मंत्रिपदे मिळाली आहेत तर त्याचा फायदा घ्या ना. मंत्रिपदे नुसते भुषवायची नसतात. तर, त्या मंत्रिपदातून लोकांना काय फायदा करून दिला, हेदेखील पाहायचे असते. आपण आज लोकांसाठी काय केले, याचे रात्री झोपताना आत्मपरिक्षण करत जा. उद्या काय करायचे आहे, याचे नियोजन करत जा, अशा शब्दांत अजित पवारांनी कान टोचले.
दर आठवड्याला आढावा बैठक घ्या
अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजीनगर सुंदर, देखणे व्हावे यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. मराठवाड्यातील दुष्काळाची सांगता व्हावी, अशीच आपली अपेक्षा आहे. त्यामुळे माझी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी योजनांचा दर आठवड्याला आढावा घेतला पाहीजे. सरकार मराठवाड्यासाठी योजना जाहीर करते. मात्र, नंतर त्या योजनांचे कामच पूर्ण होत नसल्याचे दिसते. यासाठी सरकार ज्या काही योजना जाहीर करेल, त्या योजनांचे काय झाले, याची दर आठवड्याला पालकममंत्र्यांनी माहिती घेतली पाहीजे. आढावा बैठक घेतली पाहीजे. काम कुठपर्यंत आले आहे, कुठे रखडले आहे, याची माहिती आहे. काही अडचणी असतील तर मुख्यमंत्री कार्यालय किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क केला पाहीजे. तेथून समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहीजे. असे केले तरच योजना पूर्णत्वास जावू शकतात.
योजनांसाठी पाठपुरावा आवश्यक
अजित पवार यांनी यावेळी ग्वाहीदेखील दिली की, आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री मराठवाड्यासाठी ज्या काही योजना जाहीर करतील, त्यासंदर्भात मी १५ दिवसांनी बैठक घेईल. स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही योजना प्राधान्याने पूर्ण कशा होतील, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. स्थानिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही अजित पवारांनी केले.