राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी मोठी मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. पण, फडणवीसांनी व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली. हे मला योग्य वाटत नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एकनाथ खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात आहे. २०१४ पूर्वी विधानसभेत मी जिथे बसायचो, त्याच्या पाठीमागील जागा मी फडणवीसांना दिली होती. विरोधी पक्षनेते असताना माझ्याऐवजी बोलण्याची संधी फडणवीसांना दिली. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न त्यांनी उललले. त्यांचं कौशल्यही त्यात होतं.”
“नंतरच्या कालखंडात फडणवीसांनी कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांना प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी फार मदत केली. म्हणून ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत येऊ शकले. मात्र, व्यक्तीगत रित्या माझा छळ करण्याची भूमिका त्यांनी घेतली. हे मला योग्य वाटत नाही. राजकारण राजकारणाच्या जागेवर आहे. पण, सुडाचं राजकारण महाराष्ट्राला शोभत नाही,” अशा शब्दांत खडसेंनी फडणवीसांना सुनावलं आहे.
तुमच्याबरोबर विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही अन्याय झाला का? या प्रश्नावर एकनाथ खडसे यांनी म्हटलं, “विनोद तावडे सावरले आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेत. पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत. म्हणून त्यांनी अद्याप कोणता निर्णय घेतला नाही. मी निर्णय घेऊन वेगळी दिशा आणि मार्ग अवलंबला. पंकजा मुंडे यांना काही सल्ला देऊ अशी स्थिती नाही. पंकजा मुंडे परिपक्व आहेत.”