Advertisement

औरंगाबाद जिल्हा देखील झाला छत्रपती संभाजीनगर

प्रजापत्र | Saturday, 16/09/2023
बातमी शेअर करा

मुंबई - औरंगाबाद शहराचे नाव बदलल्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्याचेही नाव देखील छत्रपती संभाजीनगर जिल्हा करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवशी तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक असताना राज्य सरकारच्या वतीने राजपत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता शहरानंतर जिल्ह्याचे नाव देखील बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले आहे. तर उस्मानाबाद शहरानंतर आता जिल्ह्याचेही नाव धाराशिव करण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले असून दोन्ही जिल्ह्यांचे नाव बदलले आहे. त्यामुळे आता उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव आणि औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर असणार आहे. वास्तविक या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्या वेळी राज्य सरकारच्या वतीने आक्षेपांची पडताळणी झाली नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे इतक्या लवकर राज्य सरकार असा निर्णय घेणार नसल्याचे वाटत होते. मात्र, आता सरकारच्या वतीने राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे. त्यानुसार आता या दोन्ही जिल्ह्यांची नावे बदलली आहेत.

 

गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी शिवेसना आणि भाजपच्या वतीने अनेकदा आंदोलने देखील करण्यात आली होती. त्यात नंतरच्या काळात मनसेची देखील भर पडली. मात्र, एमआयएम आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी या नामांतराला विरोध केला होता. त्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ यांच्या मंत्रिमंडळाने या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.

 

 

शहरांची नावे बदलली

यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यामध्ये औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसेच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचे नाव बदलण्यात आले नव्हते. ते आता राजपत्र जारी करुन बदलण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement